बेंगळुरू : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत फलंदाजीतील त्रुटी दूर करण्याचे आव्हान असतानाच, भारताच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित निवड करण्यात आली आहे. उभय संघांमधील ही मालिका सध्या दोन-दोन अशी बरोबरीत असून, मालिकेचा फैसला करणारा पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना शनिवारी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्डेडियमवर होणार आहे. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
भारत-न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबरपासून टी-२० मालिका रंगणार आहे. त्यासाठी भुवनेश्वरचा समावेश आधीच करण्यात आला होता. मात्र चौथ्या टी-२० लढतीत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या खांद्याला दुखापत झाल्याने सध्या बंगळुरूतच बीसीसीआयच्या अकादमीत सराव करणाऱ्या ३६ वर्षीय भुवनेश्वरचा पाचव्या टी-२० लढतीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अर्शदीप या लढतीला मुकण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भुवनेश्वर वेगवान माऱ्याचे नेतृत्व करू शकतो.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने पहिल्या व तिसऱ्या लढतीत विजय मिळवला, तर शाय होपच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने दुसऱ्या व चौथ्या टी-२० सामन्यात पलटवार केला. मुख्य म्हणजे जवळपास सर्व लढतीत दोन्ही डावांत २०० धावांचा टप्पा सहज गाठला जात आहे. बेंगळुरूचे मैदानही आकाराने तसे लहान असून येथे आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळतो. अशा स्थितीत फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भुवनेश्वरसह भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करणार, याकडे लक्ष असेल.
दुसरीकडे, वेस्ट इंडिजकडून कर्णधार होप व रुदरफोर्ड यांनी सातत्याने छाप पाडली आहे. तसेच चौथ्या लढतीत वेगवान गोलंदाज किमो पॉलने ५ बळी मिळवून लक्ष वेधले. अशा स्थितीत विंडीजला कमी लेखणे भारताला महागात पडू शकते. श्रेयसच्या नेतृत्वात भारताने आधीच आयर्लंड व इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावली आहे. त्यामुळे श्रेयसच्या नेतृत्वाचा कस लागणार असून प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निर्णयांवरही लक्ष असेल.
हे माहीत आहे का?
भुवनेश्वरने यापूर्वी २०२२ मध्ये २२ नोव्हेंबर रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ज्या मैदानावर त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीची सुरुवात केली होती, त्याच मैदानावर त्याचे पुनरागमन होत आहे. भुवनेश्वरने आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना चमकदार कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे.
सॅमसन, तिलकची सातत्यपूर्ण कामगिरी
सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी काही वैयक्तिक चमकदार खेळी केल्या तरी सलामीची जोडी म्हणून त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. हैदराबाद येथील सामन्यात सॅमसनने ५६ धावा केल्या, तर अभिषेकने केवळ दोन धावा जोडल्या. त्यानंतर मधली फळीही ढेपाळले आणि इशान किशन, कर्णधार श्रेयस व नमन धीर यांना मिळालेल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. तिलक वर्मा सातत्याने छाप पाडत आहे. प्रामुख्याने सॅमसन व तिलकवरच भारताची भिस्त असेल.
कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता
गोलंदाजीच्या आघाडीवर चिन्नास्वामी स्टेडियमच्या सपाट मैदानावर फिरकीपटू कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. चौथ्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना अर्शदीप सिंगच्या गोलंदाजी करणाऱ्या खांद्याला मार लागला होता, ज्यामुळे ३६ वर्षीय भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. अर्शदीपच्या प्रकृतीत सुधारणा होत असली आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी तो पूर्णपणे संघाबाहेर गेले नसल्याचे सांगितले.
लढतीवर पावसाचे सावट
पाचव्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. शुक्रवारी पावसामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द करण्यात आले. शनिवारीदेखील पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. ही मालिका संपल्यानंतर २ दिवसांतच भारतीय संघ न्यूझीलंडला दाखल होईल. २२ ऑक्टोबरपासून त्यांच्याविरुद्धची लढत सुरू होईल.
प्रतिस्पर्धी संघ
वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), ज्वेल अँड्रू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिम्रॉन हेटमायर, अकील होसेन, आमिर जांगू, शामर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शर्फेन रुदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमारिओ शेफर्ड, शामर स्प्रिंगर.
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार.
वेळ : सायंकाळी ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ वाहिनी