निर्णायक तीन फुटबॉल लढतींसाठी भारताचा २६ शिलेदारांचा चमू; पनामा, ब्राझील, उरुग्वेविरुद्धच्या सामन्यांसाठी संघाची प्रशिक्षकांकडून निवड X | @IndianFootball
क्रीडा

निर्णायक तीन फुटबॉल लढतींसाठी भारताचा २६ शिलेदारांचा चमू; पनामा, ब्राझील, उरुग्वेविरुद्धच्या सामन्यांसाठी संघाची प्रशिक्षकांकडून निवड

आगामी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक खालीद जमील यांनी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघ पनामा, पाच वेळा विश्वविजेता ब्राझील आणि दोन वेळा विश्वविजेता ठरलेला उरुग्वे यांसारख्या बलाढ्य संघांशी भिडणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आगामी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक खालीद जमील यांनी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघ पनामा, पाच वेळा विश्वविजेता ब्राझील आणि दोन वेळा विश्वविजेता ठरलेला उरुग्वे यांसारख्या बलाढ्य संघांशी भिडणार आहे.

वेळापत्रकानुसार, भारतीय संघ २६ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर पनामाविरुद्ध पहिला सामना खेळेल. त्यानंतर संघ कोलकाताला रवाना होईल, जिथे ३ ऑक्टोबर रोजी ब्राझील आणि ६ ऑक्टोबर रोजी उरुग्वेविरुद्ध सामने खेळवले जातील. हे दोन्ही सामने कोलकातातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण (साल्ट लेक स्टेडियम) येथे रंगणार आहेत.

या तिन्ही प्रतिस्पर्धी संघांनी जूनमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे उच्च मानांकन असलेल्या या संघांविरुद्धची मालिका भारतीय युवा संघासाठी आणि मुख्य प्रशिक्षक जमील यांच्यासाठी खेळाडूंच्या क्षमतेची चाचणी घेण्याची मोठी संधी असणार आहे. या मालिकेसाठी राष्ट्रीय शिबिर १४ सप्टेंबरपासून बंगळुरूत सुरू होणार आहे.

घोषित करण्यात आलेल्या २६ सदस्यीय भारतीय संघात गोलकीपर म्हणून अल्बिनो गोम्स, गुरप्रीत सिंग संधू, प्रभसुखन सिंग गिल आणि सोम कुमार यांचा समावेश आहे. बचावफळीत अभिषेक सिंग टेकचम, आकाश मिश्रा, अन्वर अली, बिजॉय वर्गीस, ह्मिंगथानमाविया राल्ते, जय गुप्ता, परमवीर आणि रिकी मीतेई हाओबाम यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

मध्यफळीत अनिरुद्ध थापा, आशिक कुरुणियान, फारुख चौधरी, लालेंगमाविया राल्ते, मॅकार्टन निक्सन, मोहम्मद सनन, रिकी शबोंग आणि सहल अब्दुल समद यांचा समावेश आहे. तर आक्रमणफळीत एडमंड लालरिनदिका, इरफान यादवाड, मनवीर सिंग, रहीम अली, रायन विल्यम्स आणि विक्रम प्रताप सिंग हे खेळाडू आव्हान सांभाळतील.

एकूणच आता भारतीय संघाच्या कामगिरीकडे लक्ष लागून असून सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर हा संघ पुन्हा कशी भरारी घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

विश्वविजेत्यांविरुद्ध खेळण्याची संधी मोलाची !

भारतासाठी या तीन लढती सुवर्णसंधी असतील. फिफा विश्वचषकात खेळलेल्या संघांसह खेळण्याची संधी सातत्याने मिळत नाही. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू या लढतीत खेळण्यास उत्सुक आहे, असे प्रशिक्षक जमील यांनी सांगितले. ब्राझील व उरुग्वे हे दोन्ही संघ माजी विश्वचषक विजेते आहेत, तर पनामादेखील यंदा विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. त्यामुळे जमील यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे आभार मानतानाच भविष्यातही भारतीय संघासाठी अशाप्रकारे लढतींचे आयोजन करण्याची विनंती केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा