नवी दिल्ली : कझाकस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सोमवारी भारतीय नारी नेमबाजीत भारी असल्याचे दिसून आले. एकीकडे वरिष्ठ गटात भारताच्या नीरू धांडाने दुहेरी सुवर्णवेध साधला. तिने एकेरी तसेच सांघिक प्रकारात सोनेरी यश मिळवले. तर कनिष्ठ गटात पायल खत्री, नाम्या कपूर व तेजस्विनी यांनी तिहेरी पदकांवर नाव कोरले.
गेला आठवडाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतासह एकूण ९ देश सहभागी झाले आहेत. मात्र भारतीय नेमबाजांनी कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन्ही गटांत पदकांची लयलूट कायम राखताना अग्रस्थान मिळवले आहे. सोमवारपर्यंत भारताच्या खात्यात १९ सुवर्ण, ९ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३७ पदके जमा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.
दरम्यान, वरिष्ठ विभागात महिलांच्या ट्रॅप प्रकारात नॅशनल गेम्स विजेत्या नीरूने ४३ गुणांसह सुवर्ण मिळवले. कतारच्या बेसिल रेने ३७ गुणांसह रौप्य, तर अशिमाने २९ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. त्यानंतर नीरूने अशिमा आणि प्रीती राजक यांच्या साथीने सांघिक विभागातसुद्धा सुवर्णपदकाला गवसणी घातली.
त्याशिवाय पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भौनीश मेंडिरट्टाने एकेरीत रौप्यपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत ४५ गुण मिळवले. चीनच्या चेन पेंग्यूने ४७ गुणांसह सुवर्ण पटकावले. भारतासाठी ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, अनंतजीत सिंग, रुद्रांक्ष पाटील, अर्जुन या पुरुषांनी आपापल्या विभागात गेल्या काही दिवसांत सुवर्णपदक पटकावले होते.
कनिष्ठ विभागात महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्याच तिघींनी पदके जिंकली. त्यापैकी पायलने ३६ गुणांसह सुवर्ण मिळवले. नाम्याला ३० गुणांसह रौप्य, तर तेजस्विनीला २७ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मग सांघिक विभागात या तिघींनी कांस्यपदकही मिळवले. तिघींना एकूण १७० गुण कमावले. कोरिया व कझाकस्तानच्या त्रिकुटाने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य जिंकले.
एकंदर या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन्ही गटांत चमक दाखवली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने नेमबाजीत ३ पदके जिंकली होती. त्यानंतर आता आगामी राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय नेमबाज उत्तम तयारी करत आहेत. त्यामुळे ३० ऑगस्टपर्यंत रंगणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताच्या पदकसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनूला एकेरीत हुलकावणी; सांघिकमध्ये यश
महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकरला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. मनूने या स्पर्धेत आधीच १० मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य जिंकले होते. मात्र सोमवारी २५ मीटर विभागात मनूला २५ गुणच मिळवता आले, तर व्हिएतनामच्या टिन विनने २९ गुणांसह कांस्यपदक जिंकले. त्यानंतर महिलांच्या सांघिक प्रकारात मात्र मनू, इशा सिंग व सिमरनप्रीत कौर यांनी कांस्यपदक जिंकले. त्यांनी १,७४९ गुण कमावून कोरियाच्या त्रिकुटावर सरशी साधली.