क्रीडा

भारतीय महिला संघाचा वेस्ट इंडिजला व्हाइटवॉश; ; दीप्तीचे सहा बळींसह फलंदाजीतही योगदान; तिसऱ्या लढतीत ५ गडी राखून धुव्वा

अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्माने प्रथम गोलंदाजीत छाप पाडताना ३१ धावांतच ६ बळी मिळवले. मग फलंदाजीत ४८ चेंडूंत नाबाद ३९ धावांचे योगदान दिले.

Swapnil S

वडोदरा : अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्माने प्रथम गोलंदाजीत छाप पाडताना ३१ धावांतच ६ बळी मिळवले. मग फलंदाजीत ४८ चेंडूंत नाबाद ३९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला ५ गडी आणि १३० चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह भारताने विंडीजला व्हाइटवॉश देताना मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या लढतीपूर्वीच भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. मग तिसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी विंडीजचा संघ ३८.५ षटकांत १६२ धावांत गुंडाळला. रेणुका सिंगने कर्णधार हीली मॅथ्यूज (०), क्विना जोसेफ (०) व दिएंड्रा डॉटिन (५) यांना पहिल्या पाच षटकांतच माघारी पाठवले. त्यानंतर चिनेरे हेन्री (६१) व शीमेन कॅम्पबेल (४६) यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. मात्र दीप्तीचे गोलंदाजीसाठी आगमन झाले व सामन्याचे रूप पालटले. तिने ३ निर्धाव षटके टाकतानाच तब्बल ६ बळी मिळवले. त्यामुळे विंडीजचा संघ २०० धावांच्या आत गारद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. स्मृती मानधना (४), हरलीन देओल (१) व प्रतिका रावल (१८) स्वस्तात माघारी परतले. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर (३२) व जेमिमा रॉड्रिग्ज (२९) यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भर घातली. हरमनप्रीत माघारी परतल्यावर दीप्तीने ३ चौकार व १ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. जेमिमा बाद झाल्यावर रिचाने ११ चेंडूंतच ३ षटकारांसह नाबाद २३ धावा फटकावल्या. रिचा व दीप्तीच्या जोडीने सहाव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचून २८.२ षटकांत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

दीप्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच ३ सामन्यांत सर्वाधिक १० बळी घेतल्याने रेणुका मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. भारताने टी-२० मालिकेत २-१ अशी बाजी मारल्यावर एकदिवसीय मालिकेत विंडीजचा धुव्वा उडवला. आता १० जानेवारीपासून भारतीय महिला आयर्लंडविरुद्ध राजकोट येथे ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्षाखेर मायदेशातच एकदिवसीय विश्वचषक रंगणार असल्याने भारताचा संघबांधणीवर भर आहे.

भारताकडून एकदिवसीय प्रकारात दीप्तीने सर्वाधिक ३ वेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. तिने एकता बिश्तला या बाबतीत मागे टाकले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल