अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी चाहत्यांना पुन्हा एकदा मनोरंजनाच्या दुहेरी पर्वणीचा लाभ घेता येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी दुपारी रंगणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अग्रस्थानासाठी आरपारची लढाई पाहायला मिळेल. दोन्ही संघांतील वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या जुगलबंदीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. या लढतीनंतर यंदाच्या आयपीएलचा अर्धा हंगाम समाप्त होईल.
अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघ तूर्तास गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे. ६ पैकी ५ लढती जिंकणाऱ्या दिल्लीला फक्त मुंबईकडून एकमेव पराभव पत्करावा लागला. गेल्या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर सुपर ओव्हरमध्ये सरशी साधली. मिचेल स्टार्कच्या वेगवान गोलंदाजीने कमाल केल्यामुळे दिल्लीने १० गुणांसह अग्रस्थान काबिज केले. आयपीएलमध्ये साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतो. त्यामुळे आता स्पर्धा मध्यावर असताना दिल्ली गुजरातला त्यांच्याच मैदानात धूळ चारणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने ६ पैकी ४ सामने जिंकले असून तूर्तास ते ८ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. गेल्या शनिवारी गुजरातचा संघ लखनऊविरुद्ध सामना खेळला, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आता एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर गुजरातचे खेळाडू मैदानात परततील. गुजरातची धावगती ही अन्य सर्व संघांपेक्षा फार सरस आहे. त्यामुळे शनिवारी त्यांनी दिल्लीला नमवले, तर ते अग्रस्थान पटकावू शकतात. नरेंद्र मोदी स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर गुजरातने या हंगामात तीनपैकी २ लढती जिंकल्या आहेत. मात्र दिल्लीविरुद्ध यापूर्वीच्या हंगामांत गुजरातने अहमदाबाद येथे दोन्ही सामने गमावलेले आहेत. त्यामुळे यंदा ते दिल्लीला रोखण्यास आतुर असतील. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा व रशिद खान या गोलंदाजांविरुद्ध दिल्लीचे फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर लढतीचा निकाल लागेल.
अहमदाबादमध्ये दव येत असल्याने धावांचा पाठलाग करण्याला संघ प्राधान्य देतात. मात्र सामन्यासाठी लाल अथवा काळ्या मातीपैकी कोणती खेळपट्टी वापरणार, हे पाहणे निर्णायक ठरेल. यंदाच्या हंगामात येथे झालेल्या तिन्ही सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तसेच तिन्ही वेळेस प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान १९० धावांचा पल्ला गाठला आहे, हे महत्त्वाचे.
स्टार्क, कुलदीप, राहुल दिल्लीची ताकद
कोणत्याही वेळी अप्रतिम गोलंदाजी करणारा डावखुरा स्टार्क, चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव आणि अनुभवी फलंदाज के. एल. राहुल हे त्रिकुट दिल्लीची मुख्य ताकद आहे. त्याशिवाय फॅफ डुप्लेसिस तंदुरुस्त होऊन संघात परतल्यास हा संघ आणखी बळकट होईल. जेक फ्रेसर सातत्याने सलामीला अपयशी ठरत आहे. अभिषेक पोरेल व करुण नायर यांच्यावर आघाडीची फळी अवलंबून असेल. अक्षर, ट्रिस्टन स्टब्स व आशुतोष शर्मा असे फटकेबाजही दिल्लीच्या ताफ्यात असल्याने त्यांची फलंदाजी तगडी दिसते. मुकेश कुमार व मोहित शर्मा यांना गोलंदाजीत कामगिरी उंचावण्याची गरज आहे. लेगस्पिनर विपराज निगम यंदाच्या हंगामात दिल्लीसाठी हुकमी एक्का म्हणून उदयास आला आहे. आतापर्यंत फक्त २०२०मध्ये एकदाच आयपीएलचाी अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्लीकडे यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे ते कामगिरीत सातत्य राखतील, अशी आशा आहे.
रशिद, गिलकडून गुजरातला अपेक्षा
गेल्या लढतीत गुजरातचे सलामीवीर गिल व साई सुदर्शन यांनी १२ षटकांत १२० धावांची सलामी नोंदवली. मात्र त्यानंतरही गुजरातचा संघ फक्त १८० धावांपर्यंतच पोहोचला. तसेच गिलचा स्ट्राइक रेट काहीसा कमी होता. त्यामुळे गिलकडून अधिक आक्रमक फलंदाजी अपेक्षित आहे. जोस बटलर व वॉशिंग्टन सुंदर उत्तम लयीत आहे. राहुल तेवतिया, शाहरूख खानकडून फटकेबाजी अपेक्षित आहे. तसेच तारांकित फिरकीपटू रशिद खानने या हंगामात अद्याप लौकिकाला साजेशी गोलंदाजी केलेली नाही. सिराज, कृष्णा व डावखुरा फिरकीपटू साईकिशोर यांच्यावर गुजरातची गोलंदाजी अवलंबून आहे.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी दिल्लीने ३, तर गुजरातने २ लढती जिंकल्या आहेत. मात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्लीने गुजरातविरुद्ध एकही लढत गमावलेली नाही. त्यामुळे गुजरात यंदा पलटवार करण्यास सज्ज असेल.
‘बेबी एबी’ ब्रेविस चेन्नईच्या ताफ्यात
चेन्नई: दक्षिण आफ्रिकेचा २१ वर्षीय युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस चेन्नई सुपर किंग्ज संघात दाखल झाला आहे. मध्यमगती गोलंदाज गुर्जापनीत सिंग दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने ब्रेविसची चेन्नईच्या संघाने निवड केली आहे. क्रीडा विश्वात ‘बेबी एबी’ नावाने लोकप्रिय असलेला ब्रेविस २०२२ व २०२४मध्ये मुंबई इंडियन्सकडून १० सामने खेळला. मात्र त्याला फारशी छाप पाडता आली नाही. मात्र गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीग आणि अन्य फ्रँचायझी स्पर्धांमध्ये त्याने चमक दाखवली. त्यामुळे त्याला आफ्रिकेकडूनही पदार्पणाची संधी लाभली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात ७५ लाख मूळ किंमत असूनही ब्रेविसवर कोणीही बोली लावली नाही. गुर्जापनीतसाठी चेन्नईने २.२० कोटी मोजले होते. त्यामुळे त्याच किमतीत आता चेन्नईने ब्रेविसला संघात सहभागी केले. त्यामुळे आता त्याला लवकरच चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंतही स्थान लाभणार का, हे पाहणे रंजक ठरेल. चेन्नईचा संघ तूर्तास ७ सामन्यांतील २ विजयांसह गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांची रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सशी गाठ पडेल.
फिलिप्सच्या जागी शनका गुजरातमध्ये
गुजरात : न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्स स्नायूंच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी गुजरात टायटन्स संघाने श्रीलंकेचा अष्टपैलू दसुन शनकाची निवड केली आहे. ३३ वर्षीय शनका हा पाचव्या-सहाव्या स्थानी फलंदाजी करण्यासह उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. तसेच २०२३मध्ये तो गुजरातकडूनच काही सामन्यांत खेळला होता. गुजरातने शनकाला ७५ लाख रुपयांत करारबद्ध केले. कगिसो रबाडाच्या जागी मात्र अद्याप कोणत्याही खेळाडूची गुजरातने निवड केलेली नाही. रबाडा वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला असून तो कधी भारतात परतेल, याविषयी संभ्रम कायम आहे. गुजरातला २०२२मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवता आले. त्यानंतर २०२३मध्ये शनका संघाचा भाग असताना या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता २ वर्षांनी शनका पुन्हा गुजरात संघाचा भाग झाल्याने हा संघ अंतिम फेरी गाठणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप