जयपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सला विजय अनिवार्य असेल. तसेच तारांकित डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या लढतीसाठी परतल्याने सलग तीन पराभव पत्करणारा दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्सला त्यांच्याच मैदानात धूळ चारणार का, हे पाहणे रंजक ठरेल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर ही लढत होणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने ८ पैकी फक्त ३ लढती जिंकल्या आहेत. मुख्य म्हणजे गेल्या ३ सामन्यांत दिल्लीला पराभव पत्करावा लागल्याने ते विजयपथावर परतण्यास उत्सुक आहेत. पंजाबविरुद्ध दिल्लीला २६५ धावांचा बचाव करता आला नाही, तर बंगळुरूविरुद्ध त्यांचा संघ ७५ धावांतच गारद झाला. त्यामुळे आता उर्वरित सहापैकी किमान पाच सामने जिंकणे दिल्लीला अनिवार्य असेल.
दिल्लीसाठी राहुल सातत्याने योगदान देत आहे. मात्र सलामीला पृथ्वी शॉ किंवा अभिषेक पोरेलला संधी मिळणे गरजेचे आहे. नितीश राणा, समीर रिझवी यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.
डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्स यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. गोलंदाजीत लुंगी एन्गिडी नसला, तरी स्टार्कच्या पुनरागमनामुळे दिल्लीला दिलासा मिळणार आहे. अक्षर मात्र फलंदाजीसह नेतृत्वात फिका पडत आहे. फिरकीपटू कुलदीप यादवच्या कामगिरीवर दिल्लीची भिस्त आहे. दुसरीकडे रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. ते बाद फेरीच्या दिशेने कूच करत आहेत. तसेच आता जयपूर येथे घरच्या मैदानात खेळताना राजस्थानला रोखणे आणखी कठीण जाऊ शकते. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल असे धडाकेबाज सलामीवीर राजस्थानची ताकद आहे. तर गेल्या लढतीत पंजाबला नमवल्यामुळे राजस्थानचा आत्मविश्वास बळावला आहे. डोनोवन फरेरा, शुभम दुबे फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. जोफ्रा आर्चर आग ओकणारी गोलंदाजी करत असून त्याला रवींद्र जडेजा, नांद्रे बर्गर यांची उत्तम साथ लाभत आहे. एकूणच राजस्थानला रोखण्यासाठी दिल्लीला त्यांचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
उभय संघांत आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. त्यांपैकी दिल्लीने १५, तर राजस्थाननेही १५ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे उभय संघांत नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. आता शुक्रवारी कोण आघाडी घेणार, याकडे लक्ष असेल.
खेळपट्टीचा अंदाज
जयपूरच्या खेळपट्टी क्रमांक चारवर ही लढत होणार आहे. येथे वेगवान गोलंदाजांना सहाय्य लाभते. तसेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गेल्या तीन सामन्यांत २००हून अधिक धावा करूनही त्यांचा येथे पराभव झाला आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करणो सोपे ठरू शकेल.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, अॅडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.