संग्रहित एक्स
क्रीडा

DC Vs CSK, IPL 2026: कोटलावर आज राज्य कुणाचे? बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली-चेन्नईला विजय अनिवार्य

गुणतालिकेत आघाडीचे संघ हरू लागल्यामुळे खालच्या क्रमांकावरील संघांना संधी निर्माण झाली आहे. त्यातच आता मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) कोण राज्य करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ स्पर्धेतील पाचवा विजय नोंदवण्यासह बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या निर्धाराने मंगळवारी मैदानात उतरतील.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गुणतालिकेत आघाडीचे संघ हरू लागल्यामुळे खालच्या क्रमांकावरील संघांना संधी निर्माण झाली आहे. त्यातच आता मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) कोण राज्य करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ स्पर्धेतील पाचवा विजय नोंदवण्यासह बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या निर्धाराने मंगळवारी मैदानात उतरतील.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने ९ पैकी ४ सामने जिंकले असून पाच लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईनेदेखील ९ पैकी तितकेच सामने जिंकले असून त्यांचाही पाच सामन्यांत पराभव झाला आहे. मात्र नेट रनरेट उत्तम असल्याने चेन्नई (०.००५) गुणतालिकेत सहाव्या, तर दिल्ली (-०.८९५) सातव्या स्थानी आहे. उभय संघांतील यंदाच्या हंगामातच पहिल्या टप्प्यात झालेल्या लढतीत चेन्नईने चेपॉकवर दिल्लीला धूळ चारली होती. तसेच दिल्लीने घरच्या मैदानात सलग दोन सामने फारच लाजिरवाण्या पद्धतीने गमावले आहेत. अशा स्थितीत ते चेन्नईवर घरच्या मैदानात वर्चस्व मिळवण्यासाठी उत्सुक असतील.

मिचेल स्टार्कच्या पुनरागमनामुळे दिल्लीची गोलंदाजी बळकट झाली आहे. तसेच सलामीवीर पथुम निसांकालाही सूर गवसला आहे. मात्र डेव्हिड मिलरला दिल्लीचा संघ संधी देणार का, याकडे लक्ष असेल. समीर रिझवी व नितीश राणा यांच्यापैकी एकाला वगळून अभिषेक पोरेललाही स्थान दिले जाऊ शकते. आशुतोष शर्मा दिल्लीसाठी प्रभावी ठरत आहे. अनुभवी के. एल. राहुलवर दिल्लीची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे.

दुसरीकडे ऋतुराजने सलग दोन अर्धशतकांद्वारे लय गवसल्याचे संकेत दिले आहेत. तसेच दिल्लीविरुद्ध गेल्या लढतीत शतक साकारणारा संजू सॅमसन कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास आतुर आहे. मधल्या फळीत शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस व सर्फराझ खान यांचे अपयश मात्र चेन्नईला सतावत आहे. गोलंदाजीत रामकृष्ण घोष दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. अशा स्थितीत अंशुल कंबोज, जेमी ओव्हर्टन व फिरकीपटू नूर अहमद याच्यावर चेन्नईची मदार असेल. महेंद्रसिंह धोनीच्या उपलब्धतेबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

खेळपट्टीचा अंदाज

दिल्लीमध्ये मैदान आकाराने लहान असल्याने येथे धावांचा पाठलाग सहज केला जातो. मात्र बंगळुरूविरुद्ध दिल्लीचा संघ ७५ धावांतच गारद झाला होता. आता चेन्नईविरुद्ध तीच खेळपट्टी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. लढतीवर पावसाचे सावट नसल्याने दर्जेदार द्वंद्व अपेक्षित आहे.

- उभय संघांत आतापर्यंत ३२ सामने झाले आहेत. त्यांपैकी चेन्नईने २०, तर दिल्लीने १२ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार चेन्नईचे पारडे जड असून दिल्ली यावेळी पलटवार करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

-दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.

-चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स, आकाश मढवाल, खलिल अहमद, स्पेन्सर जॉन्सन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता , थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

सुवेंदू अधिकारी : ममतांचे उजवे हात ते 'भावी मुख्यमंत्री'

मुक्काम पोस्ट तमिळनाडू : वारेमाप आश्वासने पूर्ण करणे आव्हानात्मक

मुक्काम पोस्ट पश्चिम बंगाल : ममतांचा बालेकिल्ला ढासळला

मुक्काम पोस्ट केरळ : 'यूडीएफ'चे वादळ; केरळमध्ये राजकीय सत्तापालट; काँग्रेसचे पुनरागमन, भाजपचे खाते उघडले

मुक्काम पोस्ट आसाम : भाजपची पकड आणखी मजबूत