गुवाहाटी : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची सलग दोन विजय नोंदवणाऱ्या राजस्थान रॉयल्सशी गाठ पडणार आहे. या लढतीत मुंबईची गोलंदाजी विरुद्ध राजस्थानची बेधडक फलंदाजी यांच्यातील जुगलबंदी पाहण्याजोगी असेल. त्यामुळे १५ वर्षीय वैभवी सूर्यवंशी विरुद्ध तारांकित जसप्रीत बुमरा यांच्यातील द्वंद्वाकडे सर्वांचे लक्ष असेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने यंदा हंगामातील पहिली लढत जिंकताना कोलकाताला नमवले. मात्र दुसऱ्या लढतीत हार्दिकच्या अनुपस्थितीत मुंबईला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या फलंदाजांनी त्या लढतीत निराशा केली. तसेच संघनिवडही चुकल्याचे दिसून आले. त्यामुळे आता गुवाहाटी येथे राजस्थानविरुद्ध मुंबई कामगिरी सुधारेल, अशी अपेक्षा आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबईने २०२०नंतर एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाही. त्यामुळे यंदा कागदावर सर्वोत्तम संघ असला, तरी त्यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.
दुसरीकडे रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने सलग दोन लढती जिंकल्या असून तूर्तास ते गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांत आहेत. गुवाहाटी येथे चेन्नईला नमवल्यानंतर राजस्थानने अहमदाबाद येथे गुजरातला धूळ चारली. त्यामुळे आता सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी राजस्थानचा संघ आतुर असेल. या लढतीवर काहीसे पावसाचे सावट आहे. मात्र तसे झाले नाही, तर चाहत्यांना दर्जेदार सामना पाहायला मिळेल.
राजस्थानसाठी वैभव व मुंबईकर यशस्वी जैस्वाल यांनी सातत्याने आक्रमक सुरुवात केली आहे. त्याशिवाय गोलंदाजीत जोफ्रा आर्चर व नांद्रे बर्गर यांची वेगवान जोडी व फिरकीपटू रवी बिश्नोई त्यांच्यासाठी छाप पाडत आहे. तुषार देशपांडेने गुजरातविरुद्ध अखेरच्या षटकात १० पेक्षाही कमी धावांचा बचाव करून दाखवला. त्यामुळे एकूणच राजस्थानची गोलंदाजी लयीत आहे. त्यांच्या मधल्या फळीचा मात्र कस लागेल. रियान, ध्रुव जुरेल, शिम्रॉन हेटमायर मुंबईच्या गोलंदाजांविरुद्ध कसे खेळणार, हे पाहणे रंजक ठरेल.
राजस्थानने २००८मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र त्यानंतर त्यांची दुसऱ्या विजयासाठी प्रतीक्षा सुरू आहे. यंदा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात हा संघ बाद फेरी गाठणार का, हे पाहणे रंजक ठरणार असून तूर्तास सर्वांचे मंगळवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे.
हार्दिक तंदुरुस्त, रोहितकडून अपेक्षा
आजारी असल्याने गेल्या लढतीला मुकलेला हार्दिक पंड्या या लढतीत परतणार असून तो मुंबईचे नेतृत्व करणार आहे. अशा स्थितीत कॉर्बिन बोश किंवा दीपक चहरपैकी एकाला मुंबईचा संघ वगळणार, हे निश्चित. तसेच ट्रेंट बोल्टचेही संघातील पुनरागमन पक्के मानले जात आहे. गेल्या लढतीत रोहित शर्मा मोठी खेळी साकारू शकला नाही. यंदा चाहत्यांचे पुन्हा त्याच्यावर लक्ष असेल. रोहितने सलामीच्या सामन्यात अर्धशतक साकारले होते. सूर्यकुमारने गेल्या सामन्यात अर्धशतक साकारून लय गवसल्याचे संकेत दिले. मात्र तिलक वर्मा, नमन धीर यांना कामगिरी सुधारावी लागेल. तसेच शर्फेन रुदरफोर्डवरही लक्ष असेल. रायन रिकल्टनकडून सातत्य अपेक्षित आहे. गेल्या लढतीत दीपक चहरने गोलंदाजीत छाप पाडली होती. मात्र बोल्टला प्राधान्य दिले जाईल, असे समजते. तसेच विल जॅक्स लवकरच संघात दाखल होणार असून त्यानंतर रुदरफोर्डलाही संघातील स्थान गमवावे लागू शकते, अशी चर्चा आहे.
उभय संघांत आतापर्यंत ३१ सामने झाले आहेत. त्यांपैकी मुंबईने १६, तर राजस्थानने १४ लढतींमध्ये बाजी मारली आहे. एक लढत रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांत तितका फरक नसल्याने लढत रंगतदार होऊ शकते.
खेळपट्टीचा अंदाज
बारसापारा स्टेडियमवर चेन्नई-राजस्थान यांच्यातील लढत जेथे झाली, त्याच खेळपट्टीवर मंगळवारचा सामना होईल. वेगवान गोलंदाजांना ही खेळपट्टी पोषक असून प्रथम फलंदाजी करणे कठीण असेल. तसेच दुपारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे माहीत आहे का?
मुंबईचा संघ प्रथमच गुवाहाटी येथे एखादा आयपीएल सामना खेळणार आहे. यंदा राजस्थानचे सातपैकी पाच सामने हे जयपूर, तर दोन सामने गुवाहाटी येथे होणार आहेत. गुवाहाटी त्यांच्यासाठी गेल्या काही वर्षांपासून घरचे मैदान म्हणून वापरण्यात येत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, अथर्व अंकोलेकर, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुनिया, युधवीर सिंग.