पंजाबचे पॅकअप की विजयी सप्तक? श्रेयसच्या शिलेदारांना बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनऊला नमवणे गरजेचे (Photo-@iplcricketmatch)
क्रीडा

पंजाबचे पॅकअप की विजयी सप्तक? श्रेयसच्या शिलेदारांना बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनऊला नमवणे गरजेचे

मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जला यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

Swapnil S

लखनऊ : मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जला यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. सुरुवातीच्या सहा लढती जिंकूनही पंजाबचा संघ साखळीतच गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळेच शनिवारी होणाऱ्या लढतीत पंजाब विजयी सप्तक साकारणार की त्यांचे पॅकअप होणार, हे पाहणे रंजक ठरेल. इकाना स्टेडियमवर त्यांची लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. बंगळुरू, गुजरात व हैदराबाद या संघांनी बाद फेरी गाठलेली असून उर्वरित एका स्थानासाठी चार संघांत चुरस आहे. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो. तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो. म्हणजे एकूणच अव्वल दोन संघांत स्थान मिळवणाऱ्या संघांला अंतिम फेरी गाठण्यासह ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असते. तर त्याउलट एलिमिनेटर खेळणाऱ्या संघांना चषक पटकावण्यासाठी सलग तीन सामने जिंकावे लागतात.

दरम्यान, यंदा २४ मे रोजी साखळी फेरी संपेल. त्यानंतर २६ मे रोजी धरमशाला येथे क्वालिफायर-१ सामना होईल. २७ मे रोजी मुल्लानपूर येथे एलिमिनेटर लढत होईल. २९ मे रोजी मुल्लानपूरलाच क्वालिफायर-२ सामना होईल. मग रविवार, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगेल. तूर्तास, (बंगळुरू-हैदराबाद सामन्यापूर्वी) गुरुवारच्या गुणतालिकेपर्यंत बंगळुरू १८ गुणांसह अग्रस्थानी आहे, तर गुजरात १८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद १६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राजस्थान (१४), पंजाब (१३), कोलकाता (१३) व दिल्ली (१२) या चार संघांत बाद फेरीच्या एका स्थानासाठी शर्यत आहे.

रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या पंजाबला गतवर्षी जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. यंदा मात्र हा संघ वेगळ्याच झोकात खेळत होता. सुरुवातीच्या सातपैकी सहा सामन्यांत पंजाबने धडाकेबाज विजय मिळवला. एका लढतीत २६५ धावांचा यशस्वी पाठलागही केला. तसेच कोलकाताविरुद्ध त्यांची लढत पावसामुळे रद्द झाली होती. सात सामन्यांतील १३ गुणांसह हा संघ सर्वप्रथम बाद फेरी गाठेल, असे वाटत होते. मात्र त्यानंतर एकामागोमाग एक सलग सहा पराभवांमुळे पंजाबचा संघ चौथ्या स्थानी घसरला आहे. आता लखनऊविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासह त्यांना रविवारी राजस्थानने मुंबईकडून पराभव पत्करावा, यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांवर पंजाबची भिस्त आहे. कूपर कोनोली काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. श्रेयसही सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. सूर्यांश शेडगे व शशांक सिंग यांना लय गवसली आहे. मात्र गोलंदाजी पंजाबसाठी चिंतेचा विषय आहे. अर्शदीप सिंग व मार्को यान्सेन यांची वेगवान जोडी धावा लुटत असून फिरकीपटू युझवेंद्र चहलही संघर्ष करत आहे. अशा स्थितीत हरप्रीत ब्रार व लॉकी फर्ग्युसन यांच्याकडून पंजाबला अपेक्षा असतील.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणारा लखनऊ संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र गेल्या चारपैकी २ लढती जिंकून त्यांनी अन्य संघांचे गणित बिघडवले आहे. मिचेल मार्श, जोश इंग्लिस ही जोडी जबरदस्त फॉर्मात आहे. पंत व निकोलस पूरन यांचा फॉर्म मात्र संपूर्ण हंगामात चर्चेचा विषय राहिला. प्रिन्स यादव उत्तम गोलंदाजी करत आहे. लखनऊचा संघ किमान शेवटची लढत जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असेल.

उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी पंजाबने ४, तर लखनऊने ३ लढती जिंकल्या आहेत. पहिल्या टप्प्याच्या लढतीत पंजाबने लखनऊला हरवले होते, त्यामुळे यावेळी लखनऊ पलटवार करणार की पंजाब पराभवाची कोंडी फोडणार, याकडे लक्ष असेल.

खेळपट्टीचा अंदाज

लखनऊला यंदाच्या हंगामात झालेल्या बहुतांश सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. खेळपट्टी क्रमांक पाचवर शनिवारी लढत होणार आहे. येथे १८० ते २०० धावाही विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. गोलंदाजांनाही येथे सहाय्य मिळत असल्याने लढत रंगतदार होईल.

हे माहीत आहे का?

  • पंजाबचा सध्याचा कर्णधार श्रेयस अय्यर हा २०२४मध्ये कोलकाताचा कर्णधार होता. त्यावेळी कोलकाताने आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र अंतर्गत वादामुळे कोलकाताने श्रेयसला संघात कायम राखले नाही.

  • यंदा सुरुवातीच्या सात सामन्यांनंतर (२५ एप्रिल रोजी) पंजाबचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी होता. त्याचवेळी कोलकाता ३ गुणांसह गुणतालिकेत १०व्या स्थानी होता. कोलकाता-पंजाब यांच्यातीलच लढत पावसामुळे रद्द झाली होती.

  • मात्र, आता १३ सामन्यानंतर कोलकाता व पंजाब दोघांचेही १३-१३ गुण आहेत. पंजाबने मे महिन्यात अद्याप एकही लढत जिंकलेली नाही, तर कोलकाताने मे महिन्यात पलटवार केला. त्यामुळे पंजाबसाठी शनिवारचा दिवस मोलाचा असेल.

प्रतिस्पर्धी संघ

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, एम. सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

Mumbai : मेट्रो लाइन-३ वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळणार

३८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा मोठे फेरबदल

घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक! उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध; सुधार समितीत तीव्र विरोध करणार, गटनेते अश्रफ आजमी यांचा इशारा

इंधन साठेबाजी करू देऊ नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश