IPL 2026 : वैभवचा अर्धशतकी धडाका; जडेजाचा चेन्नईला तडाखा 
क्रीडा

IPL 2026 : वैभवचा अर्धशतकी धडाका; जडेजाचा चेन्नईला तडाखा

अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (१८ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (१७ चेंडूंत ५२ धावा) धडाकेबाज अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे आयपीएलमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला ८ गडी व ४७ चेंडू राखून धूळ चारली.

Swapnil S

गुवाहाटी : अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (१८ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (१७ चेंडूंत ५२ धावा) धडाकेबाज अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे आयपीएलमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला ८ गडी व ४७ चेंडू राखून धूळ चारली.

गुवाहाटी येथील बारस्परा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या लढतीत महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती चेन्नईला महागात पडली. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईचा डाव १९.४ षटकांत १२७ धावांतच आटोपला. जडेजाने शिवम दुबे (६) व सर्फराझ खान (१७) यांचे बळी मिळवले. नांद्रे बर्गरने भेदक गोलंदाजीने संजू सॅमसन (६) व आयुष म्हात्रे (६) यांना माघारी पाठवले. जोफ्रा आर्चरने ऋतुराजचा अडसर दूर केला. जेमी ओव्हर्टनने ३६ चेंडूंत ४३ धावा फटकावून चेन्नईला किमान १०० धावांपलीकडे नेले. जडेजा, बर्गर व आर्चर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने १२.१ षटकांतच विजय मिळवला. वैभवने ४ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावा फटकावल्या. त्याचे हे राजस्थानसाठी दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले. यशस्वी जैस्वाल (नाबाद ३८) व ध्रुव जुरेल (१८) यांनी वैभवला उपयुक्त साथ दिली. वैभव व यशस्वीने ३८ चेंडूंतच ७५ धावांची सलामी नोंदवली. त्यामुळे राजस्थानने सहज विजय मिळवत पहिल्याच लढतीत गुणांचे खाते उघडले. तर चेन्नईच्या फलंदाजांनी गतवर्षीप्रमाणेच निराशा केली.

गतवर्षी चेन्नईला तळाच्या म्हणजेच १०व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यंदा चेन्नईतून जडेजा राजस्थानमध्ये दाखल झाला आहे. तर सॅमसन चेन्नईचा भाग झाला आहे.

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तेलंगण सरकारचा कठोर कायदा! आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के कपात

उपसभापती गोऱ्हे यांची SIT चौकशी करा; खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी

अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी