फोटो - आयपीएल
क्रीडा

RCB vs SRH, IPL 2025 : क्रमांक राखण्याचे बंगळुरूचे ध्येय; बाद फेरीतील प्रवेश पक्का असला तरी आज हैदराबादला नमवणे आवश्यक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सनरायजर्स हैदराबादशी गाठ पडणार आहे. बंगळुरूने बाद फेरीतील स्थान पक्के केले असले, तरी आघाडीच्या दोन संघांतील क्रमांक कायम राखण्यावर त्यांचा भर असेल.

Swapnil S

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सनरायजर्स हैदराबादशी गाठ पडणार आहे. बंगळुरूने बाद फेरीतील स्थान पक्के केले असले, तरी आघाडीच्या दोन संघांतील क्रमांक कायम राखण्यावर त्यांचा भर असेल.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूचे सध्या १७ गुण (१२ सामने) असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. तर, गुजरात टायटन्स १३ सामन्यांत १८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील पंजाब किंग्सचे १२ सामन्यांत १७ आणि चौथ्या क्रमांकावरील मुंबई इंडियन्सचे १३ सामन्यांत १६ गुण आहेत. या चारही संघांच्या एखाद्या जय-पराजयामुळे क्रमवारीत मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या हैदराबादविरुद्ध विजय मिळवणे बंगळुरूला गरजेचे आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर ही लढत होईल.

गेल्या शनिवारी कोलकाताविरुद्धची बंगळुरूची चिन्नास्वामी येथील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे बीसीसीआयने हैदराबादविरुद्धची लढत चिन्नास्वामीऐवजी लखनऊ येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूचा शे‌वटचा साखळी सामना २७ तारखेला लखनऊविरुद्धच होणार आहे. बंगळुरूने यंदा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानातील सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता ही बाब त्यांच्यासाठी फलदायी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

या लढतीत पुन्हा एकदा विराट कोहली चाहत्यांच्या केंद्रस्थानी असेल. १२ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर करणाऱ्या विराटला आता आयपीएल आणि भारताच्या एकदिवसीय सामन्यांतच खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. लखनऊमध्ये शुक्रवारी ज्या खेळपट्टीवर लढत होणार आहे, ती फलंदाजांसह वेगवान गोलंदाजांना पोषक ठरू शकते. त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. हैदराबादने काही दिवसांपूर्वी लखनऊमध्येच दमदार विजय नोंदवला होता, हे बंगळुरूने विसरता कामा नये.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. गेल्या लढतीत हैदराबादने लखनऊला नमवून त्यांचा खेळ खल्लास केला. त्यामुळे आता बंगळुरूचेही टेन्शन वाढवण्यासाठी हैदराबाद आतुर असेल. त्यातच ट्रेव्हिस हेड या लढतीसाठी परतल्याने बंगळुरूच्या गोलंदाजांविरुद्ध हेड व अभिषेक शर्माची फलंदाजी पाहण्यास मजा येईल. गत‌वर्षी हैदराबादने बंगळुरूविरुद्ध २८७ धावांचा डोंगर उभारला होता. ती धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातील आजवरची सर्वोत्तम आहे. एकूणच रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २५ सामन्यांपैकी बंगळुरूने ११, तर हैदराबादने १३ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार हैदराबादचे पारडे जड असले, तरी सध्या बंगळुरूचा संघ त्यांच्या तुलनेत उत्तम लयीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांत रंगतदार लढत अपेक्षित आहे.

रजतकडून सुधारणा अपेक्षित; क्लासेनपासून धोका

बंगळुरूचा कर्णधार पाटीदार गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरत आहे. मुंबईविरुद्ध साकारलेल्या अर्धशतकानंतर सात लढतींमध्ये तो एकदाही २५ धावांपुढे जाऊ शकलेला नाही. त्यातच आता तिसऱ्या क्रमांकावरील देवदत्त पडिक्कलही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे आता पाटीदारवरील दडपण वाढेल. विराट कोहली व जेकब बिथेल यांची सलामी जोडी सातत्याने योगदान देत आहे. टिम डेव्हिड व रोमारिओ शेफर्ड यांच्या स्वरुपात अखेरच्या षटकांत धडाकेबाज फलंदाजही बंगळुरूकडे आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड जायबंदी आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारवर दडपण वाढले असून त्याला कामगिरी उंचवावी लागणार आहे. यश दयाल व सुयश शर्मा सातत्याने छाप पाडत आहेत. हैदराबादच्या हेनरिच क्लासेन, हेड व अभिषेक या त्रिकुटाच्या तडाख्यापासून बंगळुरूला सावध रहावे लागेल.

मुझरबानी, सेईफर्ट पर्यायी खेळाडू

झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी आणि न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सेईफर्ट यांची बंगळुरू संघाने बाद फेरीच्या लढतींसाठी पर्यायी खेळाडू म्हणून निवड केली आहे. इंग्लंडचे खेळाडू २६ तारखेनंतर मायदेशी परतणार आहेत. त्यामुळे जेकब बिथेल, फिल सॉल्ट हे बंगळुरूतील खेळाडू माघारी जातील. त्यांच्या जागी सेईफर्टला सलामीला संधी मिळू शकते. तसेच गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एन्गिडीही माघारी परतणार असल्याने मुझरबानीची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी रंगणार असल्याने तयारीसाठी आफ्रिकन मंडळाने सर्व खेळाडूंना २६ मेपर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, जेकब बिथेल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड, मयांक अगरवाल, ब्लेसिंग मुझरबानी, टिम सेईफर्ट.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर, हर्ष दुबे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत