क्रीडा

Wimbledon 2026 : इटलीचा सिनर सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचा सिकंदर; अंतिम फेरीत झ्वेरेव्हवर चार सेटमध्ये विजय, महिलांमध्ये लिंडा विजेती

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करून ऑल इंग्लंड क्लबवर सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी रात्रीपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सिनरने ६-७ (७), ७-६ (२), ६-३, ६-४ अशा सेटमध्ये विजय नोंदवला.

Swapnil S

लंडन : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करून ऑल इंग्लंड क्लबवर सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी रात्रीपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सिनरने ६-७ (७), ७-६ (२), ६-३, ६-४ अशा सेटमध्ये विजय नोंदवला. सिनरच्या कारकीर्दीतील हे पाचवे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत अतिउष्णतेमुळे झालेल्या पराभवानंतर सिनरची ही पहिलीच स्पर्धा होती. या विजयानंतर सिनरने ‘टेनिस खेळण्यासाठी यापेक्षा उत्तम जागा नाही’अशा भावना व्यक्त केल्या.

सामन्यादरम्यान तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू ३-३ अशा बरोबरीत असताना जर्मनीच्या झ्वेरेव्हचा पाय घसरला आणि त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर झ्वेरेव्हने खेळ सुरू ठेवला, परंतु त्याचा हालचालींवर परिणाम झाला. सिनरने या संधीचा फायदा घेत तिसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेत सेट जिंकला. या सामन्यात सिनरने ५८ विनर्स मारले, तर झ्वेरेव्हला ४९ विनर्स मारता आले. सिनरने केवळ २५ अनफोर्स एरर केल्या, तर झ्वेरेव्हकडून ४५ अनफोर्स एरर झाल्या. एसीसच्या बाबतीत झ्वेरेव्ह १७-१५ ने पुढे होता.

झ्वेरेव्हविरुद्ध सिनरचा हा सलग १० वा विजय आहे. फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावून आलेल्या २९ वर्षीय झ्वेरेव्हने पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी विम्बल्डनमध्ये तीन वेळा चौथी फेरी गाठणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पराभवानंतर बोलताना झ्वेरेव्हने सिनर हा जगातील सर्वोत्तम खेळाडू का आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे नमूद केले. या पराभवानंतरही झ्वेरेव्ह सोमवारच्या ताज्या क्रमवारीत कार्लोस अल्काराझला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. अल्काराझ उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे यंदा फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळू शकला नव्हता.

या ऐतिहासिक अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रिन्स विल्यम त्यांची पत्नी केट आणि दोन मुलांसह रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत हॉलीवूड अभिनेते डस्टिन हॉफमन, निकोल किडमन आणि बेन स्टिलर यांनीही हजेरी लावली होती.

दरम्यान, शनिवारी झालेल्या महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात लिंडा नोस्कोव्हा हिने कॅरोलिना मुचोव्हा हिचा पराभव करून तिचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. तिने उपांत्य फेरीत कोस्त्यूकला, तर मुचोव्हाने अमेरिकेच्या कोको गॉफला धूळ चारली होती. एकंदर विम्बल्डन उत्साहात पार पडले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड'; लुकलुकणारे दिवे मॅनहोल दुरुस्तीवेळी महत्त्वपूर्ण ठरणार

फडणवीसांनी मोडला पवारांचा विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी

मेट्रो-५ मार्गिकेच्या कामाला वेग; उल्हासनगर मेट्रो विस्तार ४८ महिन्यांत होणार पूर्ण

आता 'एक रुग्ण, एक नातेवाईक'; रुग्णालयातील ताण आणि वादविवाद टाळणार; अभ्यागत प्रवेशिका प्रणालीकडे महापौरांनी वेधले लक्ष

वाढत्या अन्नधान्याच्या किमतीचा सामान्यांना फटका