क्रीडा

ठाण्यात आजपासून रंगणार कबड्डीचा थरार; वरिष्ठ गटाच्या पुरुष-महिलांच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ

पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर, अहमदनगर विरुद्ध नांदेड या पुरुषांच्या, तर पुणे ग्रामीण विरुद्ध नांदेड, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध ठाणे ग्रामीण या महिला गटातील लढतीने ७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला बुधवारी शुभारंभ होईल.

Swapnil S

ठाणे : पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर, अहमदनगर विरुद्ध नांदेड या पुरुषांच्या, तर पुणे ग्रामीण विरुद्ध नांदेड, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध ठाणे ग्रामीण या महिला गटातील लढतीने ७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला बुधवारी शुभारंभ होईल.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व विश्वास सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे १९ ते २३ मार्च २०२५ या कालावधीत आयोजन केले आहे. ठाणे पश्र्चिम येथील कॅडबरी कंपनीच्या समोरील जे. के. केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर या स्पर्धा होतील. ही स्पर्धा मातीच्या ६ क्रीडांगणावर सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळवण्यात येईल.

क्रीडा रसिकांकरिता प्रेक्षक गॅलरी देखील तयार करण्यात आली आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ निवडण्यात येणार आहेत. हे संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रो-कबड्डी स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजविली अशा व त्यांच्या सोबत नवोदित खेळाडूंचा देखील कस लागणार आहे. त्यामुळे कबड्डी रसिकांना कबड्डीचे रंगतदार सामने पाहण्याची संधी ठाणे जिल्हा संघटनेने उपलब्ध करून दिली आहे. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण होत आली असून सर्व कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत.

या स्पर्धेत पुरुषांत सर्व संलग्न जिल्हा संघांचा सहभाग असून महिला गटात उस्मानाबाद (धाराशिव) व हिंगोली जिल्हा संघांचा यावेळी सहभाग नाही. पुरुष व महिलांची प्रत्येकी ८ गटांत विभागणी करण्यात आली आहे. पुरुष गटात ३१ संघांचा, तर महिलांमध्ये २९ संघांचा समावेश आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली