नवी दिल्ली : फ्रंट फुटवर फलंदाजी करताना तंत्रातील बदलामुळे इंग्लंडमध्ये केएल राहुलच्या फलंदाजीत सुधारणा झाली असल्याचे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. आगामी तीन ते चार वर्षांत भारताचा हा अनुभवी खेळाडू आपल्या कामगिरीत सातत्य राखेल अशी आशा शास्त्री यांना आहे.
आतापर्यंत झालेल्या मालिकेतील तीन कसोटी सामन्यांत राहुलने ६२.५० च्या सरासरीने ३७५ धावा जमवल्या आहेत. त्यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. शुभमन गिल, ऋषभ पंत आणि जेमी स्मिथ यांच्यानंतर मालिकेत सर्वाधिक धावा जमवणारा तो चौथा फलंदाज आहे.
फ्रंट फुटवर फलंदाजी करताना त्याच्या उभे राहण्याच्या शैलीत आणि बचावात्मक खेळात थोडासा बदल करण्यात आलेला असल्याचे मला दिसते, असे शास्त्री म्हणाले.
तो बॅटचे तोंड थोडेसे उघडे ठेवत आहे. मिड विकेटच्या दिशेने फटका मारताना त्याच्या बॅटचा फेस पूर्णपणे दिसतो. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत आतापर्यंत तरी चेंडू फारसा स्विंग झालेला
नाही. मात्र जेव्हा झाला तेव्हा राहुलचे तंत्र प्रभावी ठरले. फलंदाजीतले त्याचे तंत्र मजबूत आहे, असे शास्त्री म्हणाले. राहुल आता चांगलाच फॉर्मात आहे. याचा फायदा घेत त्याने पुढची तीन ते चार वर्षे गाजवायला हवीत. मला वाटते की, तो आणखी बरीच शतके झळकावेल, असे शास्त्री म्हणाले.
त्रिफळाचीत, पायचित होण्याचा धोका कमी
नव्या तंत्रामुळे आधीच्या तुलनेत त्रिफळाचीत किंवा पायचित होण्याचा धोका कमी झाल्याचे शास्त्री यांना वाटते. पूर्वी तो बऱ्याचदा पायचित किंवा त्रिफळाचीत होत होता. मात्र आता त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे, असे शास्त्री म्हणाले.