Twitter
क्रीडा

आघाडी घेऊनही लक्ष्यच्या पदरी निराशा; बॅडमिंटनमध्ये भारताचे आव्हान पदकाविनाच संपुष्टात

Swapnil S

पॅरिस : भारताचा २२ वर्षीय प्रतिभावान बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला ऐतिहासिक कांस्यपदकाने सोमवारी हुलकावणी दिली. कांस्यपदकाच्या लढतीत पहिला गेम जिंकूनही लक्ष्यला पुढील दोन गमावल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. लक्ष्यच्या पराभवामुळे भारतीय बॅडमिंटन चमूचे ऑलिम्पिकमधील आव्हान पदकाविनाच संपुष्टात आले.

रविवारी उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसनकडून पराभव पत्करल्यामुळे लक्ष्य सोमवारी कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या ली झी जियाने लक्ष्यवर १३-२१, २१-१६, २१-११ अशी तीन गेममध्ये पिछाडीवरून सरशी साधली. त्यामुळे पुरुष एकेरीत भारतासाठी पहिला पदकवीर ठरण्याचे लक्ष्यचे स्वप्न भंगले. ऑलिम्पिकमध्ये फक्त महिला बॅडमिंटनपटूंनीच भारतासाठी आतापर्यंत पदक जिंकले आहे.

मुख्य म्हणजे पहिला गेम जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्येही लक्ष्य एकवेळ ८-४ असा आघाडीवर होता. मात्र तेथे त्याचे लक्ष काहीसे विचलित झाले. तसेच कोपऱ्याला झालेल्या जखमेतून रक्त कोर्टवर पडू लागल्याने लक्ष्यला हाताला बँडेज बांधून खेळावे लागले. येथून मग सामन्यात २-३ वेळा लक्ष्यला ब्रेक घ्यावा लागला. ८-४ अशी आघाडी त्याने गमावली व मलेशियन खेळाडूने अप्रतिम पुनरागमन करताना १२-८ अशी आघाडी मिळवली. तिसऱ्या गेममध्ये मग त्याले लक्ष्यला फारशी संधी न देता सहज विजय मिळवून कांस्यपदक प्राप्त केले. १ तास आणि ११ मिनिटांच्या संघर्षानंतर लक्ष्य पराभूत झाला.

दुसऱ्या गेममध्ये मी पूर्णपणे निराशाजनक खेळ केला. कोर्टवर रक्त पडू लागल्याने मला हाताला बँडेज लावण्याचे आदेश देण्यात आले. काही अवधीनंतर सातत्याने ब्रेक घ्यावा लागल्याने माझे लक्षही विचलित झाले. मात्र हे कारण न देता प्रतिस्पर्ध्याला श्रेय द्यावे लागेल. त्याने तिसऱ्या गेममध्ये माझ्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सध्या मी यापेक्षा अधिक बोलू शकत नाही.
- लक्ष्य सेन

गेल्या १२ वर्षांत प्रथमच भारताला बॅडमिटंनमध्ये एकही ऑलिम्पिक पदक जिंकता आले नाही. २०१२मध्ये सायना नेहवाल (कांस्य), २०१६मध्ये पी. व्ही. सिंधू (रौप्य) व २०२०मध्ये सिंधू (कांस्य) यांनी बॅडमिंटनमध्ये भारतासाठी किमान एक पदक पटकावले होते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत