ऋषिकेश बामणे/मुंबई
१७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून मायदेशी परतलेल्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे देवदुर्लभ स्वागत करण्यासाठी गुरुवारी मुंबईतील मरिन ड्राइव्हवर लाखोंचा जनसागर उसळला. जवळपास दुपारी ४ वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियम तसेच स्टेडियमबाहेरील रोडवर गर्दी करून बसलेल्या चाहत्यांवर वरुणराजाही बरसला. अखेर सायंकाळी ७.३०च्या नंतर दर्दी क्रीडाप्रेमींना विश्वविजेत्यांचे दर्शन झाले आणि अवघी मुंबापुरी जल्लोषात न्हाऊन निघाली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात केली. १७ वर्षांनी प्रथमच भारताने ही स्पर्धा जिंकली, तर २०१३ नंतर त्यांचे हे पहिलेच आयसीसी जेतेपद ठरले. भारताने या स्पर्धेत अखेरपर्यंत अपराजित राहून जगज्जेतेपद काबिज केले. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताची ही अखेरची स्पर्धा होती. २०२१पासून भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या द्रविड यांना थाटात निरोप देण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला.
गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ दुपारी ३च्या सुमारास मुंबईसाठी रवाना झाला. मुंबईत ओपनडेक बसमधून मिरवणूक काढण्यासह वानखेडेवर त्यांचा सत्कारही करण्यात येणार होता. अखेर मुंबई विमानतळावर आमगन झाल्यावर भारतीय संघाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. त्यानंतर विमानतळाबाहेरही चाहत्यांनी आधीच गर्दी केली होती. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत भारतीय संघ मरिन ड्राइव्हला पोहोचणे अपेक्षित असताना ते येईपर्यंत जवळपास सूर्यही मावळला.
मुंबईंचा राजा रोहित शर्मा, इंडिया, इंडिया... बुम बुम बुमरा, विराट कोहली, यांसारख्या घोषणांनी तोपर्यंत संपूर्ण मरिन ड्राइव्ह दुमदुमून निघाला. त्यातच वरुणराजानेही हजेरी लावल्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला. अखेर रात्री ८च्या सुमारास विश्वविजेत्यांची ओपन डेक ट्रायटेंड हॉटेलच्या येथून बाहेर पडली आणि चाहत्यांच्या आनंदाला एकच उधाण आले. अवघ्या विश्वाने भारतीय चाहत्यांचे क्रिकेटप्रेम या निमित्ताने पाहिले.
शुक्रवारी विधानभवनात महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य सरकारकडून १ कोटींचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये रोहित, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांचा समावेश आहे.