मीराबाईची सोनेरी हॅटट्रिक! राष्ट्रकुलमध्ये सलग तिसरे सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली वेटलिफ्टर X|@Glasgow_2026
क्रीडा

मीराबाईची सोनेरी हॅटट्रिक! राष्ट्रकुलमध्ये सलग तिसरे सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली वेटलिफ्टर

भारताची ३१ वर्षीय अनुभवी वेटलिफ्टर मीराबाई चानूने रविवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीराबाईने एकूण १९० किलो वजन उचलत सलग तिसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंगमध्ये सलग तीन राष्ट्रकुल सुवर्ण जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

Swapnil S

ग्लासगो : भारताची ३१ वर्षीय अनुभवी वेटलिफ्टर मीराबाई चानूने रविवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीराबाईने एकूण १९० किलो वजन उचलत सलग तिसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंगमध्ये सलग तीन राष्ट्रकुल सुवर्ण जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

२०२०च्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मीराबाईसाठी या स्पर्धेत जणू कोणी प्रतिस्पर्धी नव्हताच. तिची स्पर्धा फक्त स्वत:शीच होती. कारण मीराबाईने स्नॅच प्रकारात ८५ व क्लीन अँड जर्कमध्ये १०५ असे एकूण १९० किलो वजन उचलून सहज सुवर्णपदक काबिज केले. दुसऱ्या क्रमांकावरील नायजेरियाच्या रुथ नियाँगने एकूण १६८ किलो वजन उचलले. यावरूनच मीराबाईचे वर्चस्व अधोरेखित होते. मीराबाईने स्नॅच प्रकारात स्पर्धा विक्रम तसेच एकंदर कामगिरीद्वारे राष्ट्रकुल विक्रमही नोंदवला. मीराबाईच्या सोनेरी यशामुळे भारताच्या खात्यात यंदाच्या राष्ट्रकुलमधील पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. भारताने आतापर्यंत १ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशी एकूण ३ पदके जिंकली असून पदकतालिकेत भारताचा सातवा क्रमांक लागतो.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मीराबाई चानू, नीरज चोप्रा, लवलिना बोर्गोहैन या खेळाडूंकडून भारताला नक्कीच पदकाची अपेक्षा आहे.

दरम्यान, या ऐतिहासिक कामगिरीदरम्यान मीराबाईला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. स्नॅच प्रकारातील ८२ किलो वजनाचा तिचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. मात्र, तिने तातडीने सावरून पुढील प्रयत्नांत यश मिळवले. क्लीन अँड जर्क प्रकारातही तिचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. परंतु दुसऱ्या प्रयत्नात १०५ किलो वजन सहज उचलून तिने सुवर्णपदक आणि नवे विक्रम आपल्या नावे केले.

स्पर्धेतील सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर मीराबाईने तिचा तिसरा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली आशियाई क्रीडा स्पर्धा लक्षात घेता तिने अनावश्यक धोका न पत्करण्याचे ठरवले.

सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मीराबाई तिसरी भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी कुस्तीमध्ये सुशील कुमार (२०१०, २०१४, २०१८) व विनेश फोगट (२०१४, २०१८, २०२२) यांनी हा पराक्रम केला होता.

मीराबाईचे हे एकंदर चौथे राष्ट्रकुल पदक ठरले. २०१४मध्ये ग्लासगो येथेच झालेल्या राष्ट्रकुलमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मग २०१८, २०२२ व २०२६ या तीन स्पर्धांत तिने सुवर्ण काबिज केले.

मीराबाईची कमाई

  • ऑलिम्पिक : रौप्यपदक (२०२०)

  • राष्ट्रकुल : सुवर्णपदक (२०१८, २०२२, २०२६), रौप्यपदक (२०१४)

  • जागतिक : सुवर्णपदक (२०१७), रौप्यपदक (२०२२, २०२५)

  • आशियाई अजिंक्यपद : कांस्यपदक (२०२०)

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक; मीराबाईला अश्रू अनावर

नवी दिल्ली : राष्ट्रकुलमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकल्यानंतर हे पदक स्वीकारताना मीराबाईला अश्रू अनावर झाले. तिला भावनांना आवरणे कठीण गेले. जणू काही या पदकाद्वारे तिने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवले, असेच भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मीराबाईचे कौतुक केले.

“मीराबाईची ही कामगिरी म्हणजे भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील आणखी एक सुवर्ण अध्याय आहे. राष्ट्रकुलमधील महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीराबाईने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. सलग तीन सुवर्ण आणि एकंदर चौथे राष्ट्रकुल पदक पटकावून मीराबाईने सर्वांना आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे. भविष्यातील यशासाठी तिला शुभेच्छा,” असे ट्वीट मोदी यांनी केले.

यासोबतच पुरुषांच्या गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या ऋषिकांता सिंग याचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे. “गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत २८ वर्षीय ऋषिकांताने मणिपूरचा पहिला पुरुष वेटलिफ्टर म्हणून राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याचा इतिहास रचला. त्याच्या जिद्दीने देशवासीयांना आनंद दिला आहे,” असे मोदी म्हणाले. त्याशिवाय केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी मीराबाईच्या सुवर्ण पदकांच्या हॅटट्रिकचे कौतुक केले. २०१८, २०२२ आणि आता २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत तिने मिळवलेले सुवर्णपदक भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे मांडविया यांनी नमूद केले.

एकूणच मीराबाईच्या यशामुळे भारताच्या वाटचालीला चालना मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार असून तेथेही मीराबाई पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशीच आशा तमाम भारतीय चाहते बाळगून आहेत.

ऋषिकांताला रौप्य

ग्लासगो : भारताच्या ऋषिकांता सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ६० किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्यपदक पटकावले. क्लीन अँड जर्कमधील दोन प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ऋषिकांताचे सुवर्णपदक निसटले. भारतासाठी हे यंदाच्या राष्ट्रकुलमधील पहिले रौप्यपदक ठरले.

मणिपूरच्या या खेळाडूने स्नॅच आणि क्लिन अँड जर्क मिळून एकूण २६४ किलो (१२१+ १४३) वजन उचलले. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिव्यांगांव्यतिरिक्तच्या सर्वसाधारण क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक ठरले आहे. ऋषिकांताने स्नॅच प्रकारातील पहिल्याच प्रयत्नात १२१ किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी केली होती. या कामगिरीसह तो सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र, क्लीन अँड जर्क प्रकारात त्याला १४३ किलो वजन उचलल्यानंतर शेवटचे दोन्ही प्रयत्न पूर्ण करता आले नाहीत. त्याच्या या चुकीचा फायदा घेत मलेशियाच्या मोहम्मद कासदानने सुवर्णपदकावर कब्जा केला.

कासदानने स्नॅच प्रकारात १२१ किलो वजन उचलल्यानंतर क्लिन अँड जर्कमध्ये १५२ किलोचा नवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विक्रम नोंदवला. त्याने एकूण २७३ किलो वजन उचलून क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनाचा अशा दोन्ही क्रीडा स्पर्धा विक्रमांची नोंद करत सुवर्णपदक पटकावले.

ऋषिकांताने यंदाच्या स्पर्धेतील भारतासाठी पहिले रौप्यपदक जिंकले. तसेच वेटलिफ्टिंगमध्ये हे भारताचे दुसरे पदक ठरले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस

Mumbai : आनंदोत्सवाला लोटला तरुणाईचा जनसागर! 'रंग दे बसंती', 'वंदे मातरम' या गाण्यांवर थिरकले झेन-झी

महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्ण

Mumbai : विकास प्रकल्पांसाठी ९०० झाडांची कत्तल; २१ हजार नवीन झाडे लावणार - पालिकेचा दावा; पर्यावरणप्रेमींमध्ये शंका