मुंबई इंडियन्सची मेगा भरती; उत्थप्पा, मॅक्लेनघन, दिलीप, कुलकर्णी यांचा प्रशिक्षकांच्या चमूत समावेश (Photo-X)
क्रीडा

मुंबई इंडियन्सची मेगा भरती; उत्थप्पा, मॅक्लेनघन, दिलीप, कुलकर्णी यांचा प्रशिक्षकांच्या चमूत समावेश

अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये जणू मेगा भरती आली आहे.

Swapnil S

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये जणू मेगा भरती आली आहे. गुरुवारी तीन प्रशिक्षकांची गच्छंती केल्यानंतर शुक्रवारी मुंबई इंडियन्सने चार जणांची आपल्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात नियुक्ती केली. त्यामुळे आयपीएलच्या २०२७ हंगामासाठी मुंबई इंडियन्स एका नव्या रूपात दिसेल, हे जवळपास पक्के झाले आहे.

नव्या प्रशिक्षक फळीत प्रामुख्याने मुंबई इंडियन्सच्याच तीन माजी खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षकपद भूषवणार आहे. मॅक्लेनघन २०२५ ते २०२० या काळात मुंबईने जिंकलेल्या चार आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता. फलंदाजी प्रशिक्षकपदी रॉबिन उत्थप्पाची नेमणूक करण्यात आली आहे. २००८मध्ये उत्थप्पाने मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्याशिवाय विकासात्मक गोलंदाजी प्रशिक्षक (डेव्हलपमेंट) म्हणून मूळच्या मुंबईच्याच मराठमोळ्या धवल कुलकर्णीकडे धुरा सोपवण्यात आली आहे. त्यानेदेखील मुंबईसह २०१३ व २०२०मध्ये आयपीएल जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी भारताचे माजी प्रशिक्षक टि. दिलीप यांची निवड करण्यात आली आहे. एकूणच आता मुख्य प्रशिक्षक किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईने नव्याने संघबांधणीवर भर दिला असून संघाचा कर्णधारही बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१७ ऑक्टोबर रोजी मुंबईने विख्यात प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना अलविदा केला. जयवर्धने यांनी दोन टप्प्यांत मुंबईचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते. मात्र २०२५, २०२६ या दोन वर्षांत त्यांना फारसे यश लाभले नाही. त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या पाच जेतेपदांमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आता पोलार्डच्या घोषणेनंतर अवघ्या आठवडाभरातच मुंबईने संपूर्ण प्रशिक्षक चमू बदलला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांना मुंबईने गुरुवारी अलविदा केला होता. आता मुंबईची प्रशिक्षक फळी सज्ज झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना २०२७च्या हंगामासाठी कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी गोवा येथे मिनी ऑक्शन (खेळाडूंचा लिलाव) होणार आहे. गत हंगामात नवव्या स्थानी राहिलेल्या आणि २०२० नंतर विजेतेपद न मिळवलेल्या मुंबईला पुनरुज्जीवन मिळवून देण्याची जबाबदारी नव्या प्रशिक्षक फळीवर असेल.

२००७ मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या ४० वर्षीय उत्थप्पाने आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच्या पुनरागमनाचे स्वागत करताना मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर म्हटले की, खेळाचा सखोल अभ्यास, उत्तम संवादकौशल्य आणि युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता उथप्पाकडे आहे.

दिलीप यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघासोबत यशस्वी काम केले आहे. २०२४ आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषक विजेतेपदासह २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात ते भारतीय संघाच्या प्रशिक्षक पथकाचा भाग होते. क्षेत्ररक्षणातील चपळता, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीवर त्यांचा विशेष भर असतो.

मॅक्लेनघनने २०१५ ते २०२० या काळात मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या चार विजेतेपदांच्या मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. आक्रमक गोलंदाजी आणि अनुभवासाठी तो ओळखला जातो. त्याच्या नियुक्तीमुळे लसिथ मलिंगा आणि पारस म्हांब्रे यांची जागा भरली जाणार आहे.

धवल कुलकर्णीने २००८ ते २०१३ आणि २०२० ते २०२१ या दोन कालावधीत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०१३ आणि २०२० मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा सदस्य होता. भारतीय खेळपट्ट्यांचा अनुभव आणि मुंबई क्रिकेटशी असलेले नाते यामुळे त्याची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

कर्णधारपदासाठी रोहितचीच चर्चा

* मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या नसेल, हे आता सर्वश्रुत आहे. तसेच हार्दिक दुसऱ्या संघात ट्रेड होण्याची (अदलाबदली) अधिक संधी आहे. अशा स्थितीत मुंबईचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे जाऊ शकते.

* रोहितच्या नेतृत्वात मुंबईने २०१३ ते २०२० या काळात पाच वेळा आयपीएल जिंकली. २०२३पर्यंत रोहित मुंबईचा कर्णधार होता. मात्र मार्क बाऊचर यांच्या प्रशिक्षणाच्या काळात हार्दिककडे २०२४मध्ये कर्णधारपद सोपवण्यात आले. २०२४ व २०२६मध्ये मुंबईला बाद फेरी गाठता आली नाही, तर २०२५मध्ये मुंबई क्वालिफायर-२ पर्यंत पोहोचली. विशेषत: गेल्या हंगामात मुंबईच्या संघात एकी नसल्याचे दिसून आले.

* मुख्य प्रशिक्षकपदावरून महेला जयवर्धने यांची झालेली बदली आणि त्यानंतर प्रशिक्षक फळीत नेमण्यात आलेले मुंबईचेच माजी खेळाडू यावरून रोहितच पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल, असे समजते. एका इंग्रजी संकेतस्थळाने त्याविषयी वृत्तही दिले आहे. तिलक वर्मा उपकर्णधार होण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव व जसप्रीत बुमराही शर्यतीत आहे.

* सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने कर्णधारपदासाठी तिलकचे नाव सुचवले होते. मात्र संघ व्यवस्थापन तसेच संघमालकांनी रोहितलाच कर्णधारपद स्वीकारण्यासाठी आग्रह केल्याचे समजते. त्यामुळे लवकरच मुंबई इंडियन्स कर्णधारपदाबाबत अधिकृत घोषणा करेल, असे समजते.

अशी आहे प्रशिक्षकांची फळी

  • मुख्य प्रशिक्षक : किरॉन पोलार्ड

  • फलंदाजी प्रशिक्षक : रॉबिन उत्थप्पा

  • गोलंदाजी प्रशिक्षक : मिचेल मॅक्लेनघन

  • क्षेत्ररक्षण प्रशिक्षक : टी. दिलीप

  • विकासात्मक गोलंदाजी प्रशिक्षक : धवल कुलकर्णी

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे; पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार

Mumbai : वांद्रे टर्मिनसचा विस्तार होणार; गरीबनगरमधील ९४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, पश्चिम रेल्वेचा दणका

किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रक्षक; प्रतापगड, राजगड, साल्हेर, खांदेरीसाठी २.९३ कोटींची मान्यता

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण : आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांना मारहाण?

Thane : आता सोमवारी पाणीकपात; मनपा क्षेत्रात १० टक्के कपात २ नोव्हेंबरपासून लागू