मुंबई : पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. त्यातच अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला स्नायूंची दुखापत झाल्याने मुंबईची चिंता बळावली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यालादेखील दंड ठोठावण्यात आला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईला १८ धावांनी पराभूत केले. बंगळुरूने दिलेल्या २४१ धावांचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ५ बाद २२२ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात रोहित १३ चेंडूंत १९ धावा करून स्नायू ताणले गेल्यामुळे रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला. त्यानंतर रोहित फलंदाजीस आला नाही. रोहितला सोमवारी स्कॅनसाठी पाठवण्यात आल्याचे समजते. त्याच्या तंदुरुस्तीविषयी मंगळवारपर्यंत समजेल. गुरुवारी वानखेडेवरच मुंबईचा पंजाबशी सामना होणार आहे. तसेच ४ पैकी एकच लढत जिंकल्याने मुंबईसाठी रोहित तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.
दुसरीकडे या लढतीत षटकांची गती संथ राखल्याबद्दल मुंबईचा कर्णधार हार्दिकला दंड ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत मुंबईने १ षटक कमी टाकले. मुंबईने गोलंदाजीच्या वेळेस २० षटके पूर्ण करण्यासाठी १२१ मिनिटे (२ तास १ मिनिट) घेतली. तसेच बंगळुरूने १२४ मिनिटे (२ तास ४ मिनिटे) वेळ घेतला. मात्र बंगळुरू संघाला दंड ठोठावण्यात आलेला नाही. कारण त्यांच्या गोलंदाजीदरम्यान बराचसा वेळ हा खेळाडूंच्या दुखापतीमुळे वाया गेला. रसिक दर एकाच षटकात ३ वेळा जायबंदी झाला, तसेच रोहितवरही उपचार करण्यात वेळ गेला.
दरम्यान, बंगळुरूचा फलंदाज टिम डेव्हिडला सामन्याच्या मानधनापैकी २५ टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला. चेंडू बदलण्याच्या निर्णयाविरोधात डेव्हिडने पंचांशी वाद घातला होता.
आयपीएल गुणतालिका
(मुंबई वि. बंगळुरू सामन्यापर्यंत)