श्रेयस अय्यर एक्स @Saabir_Saabu01
क्रीडा

श्रेयसच्या जिगरबाज शतकामुळे मुंबईचा चौथा विजय; विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

कर्णधार श्रेयस अय्यरने शुक्रवारी १३३ चेंडूंत नाबाद १३७ धावांची जिगरबाज खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा १६३ धावांनी फडशा पाडला.

Swapnil S

अहमदाबाद : कर्णधार श्रेयस अय्यरने शुक्रवारी १३३ चेंडूंत नाबाद १३७ धावांची जिगरबाज खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा १६३ धावांनी फडशा पाडला. मुंबईचा हा सहा सामन्यांतील चौथा विजय ठरला.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या क-गटातील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत ९ बाद २९० धावांपर्यंत मजल मारली. अंक्रिश रघुवंशी (०), आयुष म्हात्रे (१), सिद्धेश लाड (३४), सूर्यकुमार यादव (०) या आघाडीच्या फलंदाजानी निराशा केली. मात्र पाचव्या क्रमांकावरील श्रेयसने १६ चौकार व ४ षटकारांसह लिस्ट-ए कारकीर्दीतील १४वे शतक साकारले. अथर्व अंकोलेकरने ४३ धावा करताना श्रेयससह सातव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी रचली. तसेच ९ बाद २२५ अशी स्थिती असताना श्रेयसने उर्वरित १० षटके हर्ष तन्नासह (१) फलंदाजी करताना तब्बल ६५ धावा कुटल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना पुद्दुचेरीचा संघ २७.२ षटकांत १२७ धावांत गारद झाला. आकाश कारगवेने ५४ धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईकडून शार्दूल ठाकूरने ३, तर सूर्यांश शेडगे व आयुष यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. या विजयानंतरही मुंबई क-गटात तिसऱ्या स्थानी आहे. त्यांचे ६ सामन्यांतील ४ विजयांमुळे १६ गुण आहेत. मुंबईची रविवारी सौराष्ट्रशी गाठ पडेल. पंजाब व कर्नाटक ६ सामन्यांतील ५ विजयांच्या २० गुणांमुळे अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर विराजमान आहेत.

विदर्भाच्या करुणचा विश्वविक्रम

विदर्भाचा कर्णधार करुण नायरने शुक्रवारी आणखी एक शतक झळकावून विश्वविक्रम प्रस्थापित केला. लिस्ट-ए स्पर्धेत म्हणजेच देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत बाद न होता सर्वाधिक ५४२ धावा करण्याचा पराक्रम करुणने केला. त्याने २०१०चा जेम्स फ्रँकलिनचा ५२७ धावांचा विक्रम मोडीत काढला. करुणने या स्पर्धेत ५ सामन्यांत ४ शतकांसह ५४२ धावा केल्या आहेत. शुक्रवारी तो बाद झाला. मात्र यापूर्वीच्या चार लढतींमध्ये तो नाबाद होता.

ड-गटातील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने ५० षटकांत ८ बाद ३०७ अशी धावसंख्या उभारली. समीर रिझवीने १०५ धावांची खेळी साकारली. मात्र करुणने १०१ चेंडूंत ११२, तर यश राठोडने नाबाद १३८ धावा फटकावल्या. त्यामुळे विदर्भाने ४७.२ षटकांत फक्त २ विकेट गमावून लक्ष्य गाठले. विदर्भाचा हा सलग पाचवा विजय ठरल्याने ते गटात अग्रस्थानी विराजमानी आहेत.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला