PTI
क्रीडा

...तर पदकांची संख्या वाढेल! नारंगचा ऑलिम्पिकच्या अधिकाधिक क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याचा भारतीय खेळाडूंना सल्ला

पुढील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने सहभागी खेळाडूंची संख्या वाढवावी, तसे झाले तरच पदकांची संख्याही वाढेल, असे मत भारताचा माजी नेमबाज आणि पथकप्रमुख गगन नारंगने व्यक्त केली.

Swapnil S

पॅरिस : पुढील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने सहभागी खेळाडूंची संख्या वाढवावी, तसे झाले तरच पदकांची संख्याही वाढेल, असे मत भारताचा माजी नेमबाज आणि पथकप्रमुख गगन नारंगने व्यक्त केली.

नुकताच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने ११७ खेळाडूंचे पथक पाठवले होते. भारताचे खेळाडू १६ क्रीडा प्रकारांत सहभागी झाले. मात्र भारताला ६ पदके जिंकण्यात यश आले. बहुतांश क्रीडा प्रकारांत भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने पदकाने हुलकावणी दिली, तर काही प्रकारांत भारतीय खेळाडूंनी सपशेल निराशा केली. आता २०२८च्या लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये भारताने अधिकाधिक क्रीडा प्रकारांत सहभागी व्हावे, असे नारंगने सुचवले आहे. नारंग हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा पथकप्रमुख होता.

“पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. मात्र वैयक्तिकदृष्ट्या आपल्या देशात आणखी पदके जिंकण्याची क्षमता आहे. आपण या स्पर्धेत १० पदकांचा आकडा नक्कीच गाठू शकलो असतो,” असे नारंग म्हणाला. भारताने या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ३ पदके जिंकली.

“नेमबाजांनी यावेळी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र पुढील वेळेस नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांत आपला सहभाग वाढणे गरजेचे आहे. ११७ ऐवजी आपण जेव्हा १५० ते २०० खेळाडूंचे पथक ऑलिम्पिकसाठी पाठवू, तेव्हा आपोआपच आपली पदकसंख्याही वाढेल. २०२८च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंनी आतापासूनच मेहनत घेणे गरजेचे आहे,” असेही नारंगने नमूद केले.

विश्रांतीच्या काळातही खेळाडूंकडे लक्ष द्या!

“कोणत्याही खेळाडूच्या तयारीवर लक्ष देण्यासह जेव्हा स्पर्धा सुरू नसतात. तेव्हा तो खेळाडू विश्रांतीच्या काळात काय करतो, कुठे जातो, याची माहिती संघटना किंवा त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांना असणे गरजेचे आहे. टॉप्स योजनेंतर्गत अनेक खेळाडूंवर केंद्र शासन लक्ष ठेवून असते. त्यांच्या पूर्ण तयारीवर भर देते. मात्र खेळाडूनेही स्वत:हून विश्रांतीच्या काळातील तपशील सादर केल्यास ते डोपिंगसारख्या प्रकरणात अडकण्याची भीती कमी होईल,” असे नारंग म्हणाला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प