पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तीन युवा अफगाण खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) एक मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्धची आगामी त्रिकोणी टी-२० मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्रिकोणी मालिकेवर संकट
१७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पाकिस्तानमध्ये ही त्रिकोणी मालिका होणार होती, ज्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ सहभागी होणार होते. मात्र, पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यात झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात तीन खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर ACB ने तातडीने आपत्कालीन बैठक घेऊन या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
ACB चे अधिकृत निवेदन
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की “पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंचे दुःखद बलिदान आम्हाला खोलवर वेदना देणारे आहे. हा हल्ला अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदायासाठी, खेळाडूंसाठी आणि संपूर्ण क्रिकेट कुटुंबासाठी मोठं नुकसान आहे.”
ACB ने पुढे स्पष्ट केले की, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर बळींना आदरांजली म्हणून नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या त्रिकोणी मालिकेत सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मौन
अफगाणिस्तानच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. मात्र, क्रिकेट विश्लेषकांच्या मते, मालिका रद्द झाल्यास PCB ला प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि तिकीट विक्री या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
शिवाय, या निर्णयामुळे आधीच तणावपूर्ण असलेले पाकिस्तान-अफगाणिस्तानचे राजनैतिक आणि क्रीडासंबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय प्रतिष्ठा सर्वस्वी - क्रिकेटर राशिद खान
अफगाणिस्तानचा स्टार ऑलराउंडर राशिद खानने सोशल मीडियावर पोस्ट करत ACB च्या निर्णयाचे स्वागत करत या घटनेचा निषेध केला आहे. त्याने लिहिले “पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे महिला, मुले आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहणारे तरुण खेळाडू मृत्युमुखी पडले. हे अत्यंत वेदनादायक आहे. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हे पूर्णपणे अनैतिक आणि क्रूर आहे. या अन्याय्य आणि बेकायदेशीर कृती मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन दर्शवितात आणि त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये." त्याने शेवटी स्पष्ट शब्दात म्हटले, आपली राष्ट्रीय प्रतिष्ठा सर्वस्वी महत्त्वाची असली पाहिजे. राशिदच्या या पोस्टला जागतिक क्रिकेट समुदायाकडून तसेच विशेष करून भारतातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय खेळाडूनी हे शिकलं पाहिजे अशी भावना भारतीय नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सामन्यातून परतत असताना हल्ला
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवेदनानुसार, हे तिघे खेळाडू पक्तिका प्रांताची राजधानी शराना येथे एका फ्रेंडली क्रिकेट सामन्यासाठी गेले होते. सामना संपल्यानंतर ते उरगुनकडे आपल्या घरी परतत असताना पाकिस्तानी लष्कराच्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. बोर्डाने सांगितले की, या हल्ल्यात ५ अन्य नागरिकही ठार झाले, तर ७ जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानकडून युद्धविरामाचे उल्लंघन
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षाला गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. इस्लामाबादने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (TTP) ठिकाणांवर हल्ला केल्यापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या चकमकीनंतर बुधवारी (दि. १५) सायंकाळी दोन्ही बाजूंनी युद्धविरामास मान्यता दिली होती. परंतु, शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे हा शस्त्रविराम तुटला.
स्थानिक माध्यमांनुसार, हे हल्ले ड्युरंड रेषेजवळील उरगुन आणि बरमल जिल्ह्यांवर झाले, जेथे मोठ्या संख्येने नागरिक राहत होते. या भागांतील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.