X (@pranabbaruah261)
क्रीडा

U19 Asia Cup: अंतिम फेरीत भारताचा दारुण पराभव; पाकिस्तानकडून तब्बल १९१ धावांनी फडशा; फलंदाज पूर्णपणे अपयशी

मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय युवा संघाला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अंतिम फेरीत पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या लढतीत भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंत शाब्दिक चकमकदेखील झाली.

Krantee V. Kale

दुबई : मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय युवा संघाला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अंतिम फेरीत पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला. समीर मिन्हासने (११३ चेंडूंत १७२ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर पाकिस्तानने भारताला तब्बल १९१ धावांनी धूळ चारली. भारताची फलंदाजी अंतिम फेरीत पूर्णपणे अपयशी ठरली.

भारताने स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा अ-गटात सलग तीन साखळी सामने जिंकून आगेकूच केली होती. त्यांनी अनुक्रमे यूएई, पाकिस्तान व मलेशियाचा धुव्वा उडवला. दुसऱ्या गटातून बांगलादेश व श्रीलंका यांनी आगेकूच केली. बांगलादेशने ब-गटात तिन्ही लढती जिंकल्या होत्या. मात्र उपांत्य फेरीत ते पाकिस्तानसमोर निष्प्रभ ठरले. साखळी लढतीत भारताने पाकिस्तानला सहज पराभूत केले होते. मात्र रविवारी अंतिम फेरीत पाकिस्तानने सुरुवातीपासून भारतावर वर्चस्व गाजवले.

नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी स्वीकारली. मात्र पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर समीरने १७ चौकार व ९ षटकारांसह १७२ धावा तडकावल्या. त्याला अहमद हुसैन (५६), उस्मान खान (३५) यांची उत्तम साथ लाभली. भारताकडून दिपेशने तीन बळी मिळवले, मात्र त्यासाठी ८३ धावा लुटल्या. एकूणच भारताचे गोलंदाज अपयशी ठरले.

मग लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ २६.२ षटकांत १५६ धावांत गारद झाला. आयुष (२), विहान मल्होत्रा (७), वेदांत त्रिवेदी (९) यांनी निराशा केली. मग वैभव सूर्यवंशी (१० चेंडूंत २६), आरोन जॉर्ज (९ चेंडूंत १६) यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र वेगवान गोलंदाज अली रझाने ४, तर मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभनने २ बळी मिळवून भारताला रोखले. दिपेशने १६ चेंडूंत ३६ धावा फटकावून भारताचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाच २७व्या षटकात बाद करून पाकिस्तानने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शतकवीर समीरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पुढील वर्षी १५ जानेवारीपासून नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे १९ वर्षांखालील युवांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी आशियाई खंडातील देशांना सराव व्हावा, या हेतूने दुबईत युवा आशिया चषक खेळवण्यात आला. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. दरम्यान, या लढतीत भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंत शाब्दिक चकमकदेखील झाली. वैभव, आयुष पाकिस्तानी खेळाडूंशी रागाच्या भरात बोलताना आढळले. गेल्या काही काळापासून पहलगमाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उभय संघांतील लढतींना वेगळेच रूप लाभत आहे. भारताने वरिष्ठांच्या आशिया चषकात पाकिस्तानला तीन वेळा धूळ चारली होती. मात्र युवा आशिया चषकात पाकिस्तानने वचपा काढला. आता विश्वचषकात उभय संघ आमनेसामने येतील, तेव्हा पुन्हा एकदा चाहत्यांचे या लढतीकडे लक्ष असेल.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : ५० षटकांत ८ बाद ३४७ (समीर मिन्हास १७२, अहमद हुसैन ५६; दिपेश देवेंद्रन ३/८३ विजयी वि. g भारत : २६.२ षटकांत सर्व बाद १५६ (दिपेश देवेंद्रन ३६, वैभव सूर्यवंशी २६; अली रझा ४/४२)

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी