बॅडमिंटनच्या नव्या गुणपद्धतीमुळे खेळाडूंची कारकीर्द धोक्यात : गोपीचंद  
क्रीडा

बॅडमिंटनच्या नव्या गुणपद्धतीमुळे खेळाडूंची कारकीर्द धोक्यात : गोपीचंद

बॅडमिंटन विश्वात लागू होणाऱ्या नव्या गुणरचना पद्धतीमुळे खेळाच्या रणनीतीत मोठा बदल होणार असून, यामुळे काही खेळाडूंचे अस्तित्वच संपेल, असा दावा भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केला आहे. पुढील वर्षापासून सध्याच्या २१ गुण (३ गेम्स) पद्धतीऐवजी १५ गुण (३ गेम्स) अशी नवीन पद्धत लागू होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बॅडमिंटन विश्वात लागू होणाऱ्या नव्या गुणरचना पद्धतीमुळे खेळाच्या रणनीतीत मोठा बदल होणार असून, यामुळे काही खेळाडूंचे अस्तित्वच संपेल, असा दावा भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केला आहे. पुढील वर्षापासून सध्याच्या २१ गुण (३ गेम्स) पद्धतीऐवजी १५ गुण (३ गेम्स) अशी नवीन पद्धत लागू होणार आहे. खेळाडूंच्या व्यस्त वेळापत्रकात त्यांचा ताण कमी करण्यासाठी बॅडमिंटन जागतिक महासंघाने (बीडब्ल्यूएफ) हा निर्णय घेतला आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात गोपीचंद म्हणाले की, “२००१ मध्ये ऑल इंग्लंड विजेतेपद पटकावल्यानंतर ७ गुणांच्या फॉरमॅटचा प्रयोग करण्यात आला होता, परंतु वर्षभरात तो बंद करून जुनी पद्धत आणली गेली. अशा बदलांमुळे खेळाडूंच्या सहनशक्तीवर परिणाम होतो. नव्या १५ गुणांच्या फॉरमॅटमध्ये वेग, ताकद आणि मानसिक कणखरतेला अधिक महत्त्व प्राप्त होईल. चुका टाळणे आणि ११व्या व १२व्या गुणावर दडपण हाताळणे अत्यंत कठीण ठरणार आहे.”

नव्या पद्धतीचा सर्वाधिक फटका दुहेरीच्या खेळाडूंना बसेल, असे गोपीचंद यांनी नमूद केले. “सर्व्हिस आणि अटॅक अधिक आक्रमक होतील. दीर्घ रॅलीज ऐवजी वेगवान आणि समांतर (फ्लॅट) खेळावर भर दिला जाईल, ज्यामुळे खेळातील मूळ कौशल्य कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. खेळाडूंचा ताण कमी करण्यासाठी स्पर्धा ६ दिवसांऐवजी १० ते १२ दिवसांची केली असती, तरी हे साध्य झाले असते; त्यामुळे 'बीडब्ल्यूएफ'च्या युक्तिवादाशी आपण सहमत नाही,” असे गोपीचंद यांनी सांगितले.

या नव्या रचनेचा फायदा एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांतसारख्या अनुभवी भारतीय खेळाडूंना होऊ शकतो, असे मत गोपीचंद यांनी व्यक्त केले. दरम्यान, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यानंतर पुरुष दुहेरीत भारताकडे पर्याय उपलब्ध नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. देशात अकादमींची संख्या वाढली असली, तरी एकेरीतील खेळाडू दुहेरीकडे वळण्यास तयार होत नाहीत, ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृष्णा-पृथ्वीची सलामी

भारताच्या बिगरमानांकित कृष्णा प्रसाद गरगा आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीने कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी कामगिरी नोंदवली आहे. मंगळवारी पुरुषांच्या दुहेरीतील पहिल्या फेरीच्या सामन्यात या जोडीने सहाव्या मानांकित चॅलोएमपोन चारोएनकितामॉर्न आणि वॉरापोल थॉंगसा-अंगा या जोडीला सरळ गेममध्ये पराभूत केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावल्यास थेट कारवाई; उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पोलीस महासंचालकांचे आदेश

Mumbai : पदपथ अतिक्रमणमुक्तीसाठी ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान; ३५० किमीवरील पदपथ अतिक्रमणमुक्त होणार

उरण बायपास २४ वर्षांपासून रखडला; केवळ १२ कोटींच्या निधीअभावी भवितव्य अधांतरित

BEST ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी २८ हजार कोटींची गरज; १० हजार बसेस, ३६ हजार खासगी वाहने पार्किंगची सुविधा

Mumbai : सभागृहातील आवाज होणार खणखणीत; ध्वनियंत्रणा बदलणार, माइक उचलाउचली बंद