एक्स
क्रीडा

मुंबईची आजपासून हरयाणाशी लढत! रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला प्रारंभ

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली गतविजेता मुंबईचा संघ शनिवारपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत हरयाणाविरुद्ध उपांत्यपूर्व लढत खेळणार आहे.

Swapnil S

कोलकाता : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली गतविजेता मुंबईचा संघ शनिवारपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत हरयाणाविरुद्ध उपांत्यपूर्व लढत खेळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीसाठी मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. याव्यतिरिक्त, देशातील विविध शहरांत अन्य तीन उपांत्यपूर्व लढती होणार आहेत.

लाहली येथे हरयाणाच्या मैदानात मुंबई-हरयाणा लढत होणे अपेक्षित होते. मात्र तेथील वातावरण तसेच खेळपट्टी यांपैकी एका कारणास्तव बीसीसीआयने ही लढत कोलकाता येथे खेळवण्याचा निर्णय घेतला, असे समजते. त्यामुळे दोन्ही संघांना सरावासाठी एक दिवस कमी मिळाला आहे. हरयाणाने यंदा क-गटात अग्रस्थान मिळवून आगेकूच केली. अशोक मनेरियाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात जयंत यादव, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, हिमांशू राणा, यष्टिरक्षक रोहित शर्मा असे खेळाडू आहेत.

दुसरीकडे एकवेळ बाद फेरी गाठणे कठीण दिसत असतानाही मुंबईने अखेरच्या सामन्यात मेघालयला धूळ चारली. त्यामुळे अ-गटातून २९ गुण मिळवून दुसऱ्या स्थानासह मुंबईने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. आता या लढतीसाठी श्रेयस अय्यर नसला, तरी सूर्यकुमार यादव, शिवम दुबे मुंबईच्या संघात परतले आहेत. त्याशिवाय शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, शम्स मुलाणी उत्तम लयीत आहेत. त्यामुळे मुंबई कागदावर हरयाणाच्या तुलनेत सरस वाटत आहे.

दरम्यान, पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात अ-गटातील विजेते म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि क-गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ केरळ एकमेकांशी दोन हात करतील. तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत नागपूर येथे विदर्भ-तमिळनाडू आमनेसामने येतील. चौथ्या सामन्यात राजकोट येथे सौराष्ट्र-गुजरात खेळतील. मुंबई-हरयाणा लढत सकाळी ९ वाजता सुरू होईल, तर अन्य तिन्ही उपांत्यपूर्व सामने ९.३० वाजता सुरू होतील. सर्व उपांत्यपूर्व लढतीचे जिओ सिनेमा ॲपवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

यंदा उपांत्य व अंतिम फेरी कुठे होईल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. २०२४मध्ये मुंबईने रणजी ट्रॉफीचे जेतेपद मिळवले होते. त्यावेळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना झाला होता.

वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा ॲप

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास