मुंबई: देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. प्रामुख्याने भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवण्यासह पुनरागमन करण्यास आतुर असलेल्या तारांकित खेळाडूंच्या कामगिरीकडे या स्पर्धेत विशेष लक्ष असेल. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वीच जाहीर केलेल्या आदेशानुसार यंदाही वरिष्ठ खेळाडूंना शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असेल. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २०२७मध्ये १७जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. ९ फेब्रुवारीपासून उपांत्यपूर्व फेरी, १८ फेब्रुवारीपासून उपांत्य फेरी, तर २७ फेब्रुवारीपासून महाअंतिम सामना रंगेल.
गतवेळेस जम्मू आणि काश्मीरने कर्नाटकला नमवून रणजी स्पर्धेचे पहिल्यांदाच ऐतिहासिक जेतेपद काबिज केले होते. स्पर्धेत यंदाही एकूण ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील. प्लेट गटातील विजेता संघ एलिट गटात दाखल होतो. तर चारही एलिट गटातील तळाच्या संघांपैकी एक संघ प्लेट गटात ढकलला जातो.
सर्वाधिक ४२ वेळा रणजी स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ यंदा ड-गटात असून सिद्धेश लाड संघाचे नेतृत्व करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर चंदिगडविरुद्धच्या लढतीने मुंबई आपल्या अभियानास प्रारंभ करेल. ओमकार साळवी चौथ्या हंगामात मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवणार आहेत. गेल्या वेळेस मुंबई उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली.
दरम्यान, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी अनेक खेळाडूंना लय मिळवण्याची संधी आहे. तसेच भारत-अ संघदेखील ऑक्टोबरच्या अखेरीस ३ कसोटी लढतींसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात अनेक खेळाडूंना रणजीतील कामगिरीच्या आधारे संधी मिळू शकते. त्यामुळे रणजी स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे.
या ताऱ्यांवर नजरा
रणजी स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या भारताच्या कसोटी संघातील ताऱ्यांवर लक्ष असेल. त्याशिवाय सर्फराझ खान, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मोहम्मद शमी हे खेळाडू निवड समितीचे लक्ष वेधण्यास आतुर असतील.
यशस्वी, सर्फराझ मुंबईचे प्रतिनिधित्व करतील. राहुल कर्नाटककडून खेळताना दिसेल. सिराज हैदराबादचे नेतृत्व करणार आहे, तर जडेजा सौराष्ट्रकडून खेळणार आहे. तसेच गतवर्षी सर्वाधिक बळी घेत जम्मूला जेतेपद मिळवून देणारा गोलंदाज आकिब नबीने आता भारतीय संघाकडून पदार्पण केले असले, तरी रणजीत पुन्हा तो छाप पाडणार का, याकडे लक्ष असेल..
काही खेळाडूंनी हंमागापूर्वी संघबदल केले असून विदर्भाचा उमेश यादव आता पंजाबकडून, आंध्र प्रदेशचा हनुमा विहारी त्रिपुराकडून, तर पंजाबचा नेहल वधेरा आता हिमाचल प्रदेशकडून खेळताना दिसेल.
दरम्यान, भारत-अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असल्याने देवदत पडिक्कल, रजत पाटीदार, ऋतुराज, साई सुदर्शन हे खेळाडू रणजीतील सलामीच्या सामन्यांना मुकतील.
स्पर्धेची गटवारी
अ-गट: बडोदा, बिहार, गोवा, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, उत्तर प्रदेश, विदर्भ
ब-गट: आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, हैदराबाद, कर्नाटक, पंजाब, सौराष्ट्र, त्रिपुरा
क-गट: बंगाल, दिल्ली, गुजरात, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, सेनादल
ड-गट : मुंबई, चंदीगड, हरयाणा, हिमाचल प्रदेश, रेल्वे, राजस्थान, तमिळनाडू, उत्तराखंड
प्लेट गट: अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालैंड, सिक्कीम
सकाळी ९ वाजल्यापासून ठराविक तीन साखळी लढतींचे स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओहॉटस्टार अॅपवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल.