

राजस्थान : मुलीच्या लग्नात वडिलांची उपस्थिती किती महत्त्वाची असते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. लेकीला लग्नमंडपात घेऊन जाण्यापासून ते तिची सासरी पाठवणी करण्यापर्यंत प्रत्येक क्षणी वडिलांची साथ मोलाची असते. मात्र, राजस्थानमधील एका तरुणीच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आला, तेव्हा तिचे वडील हयात नव्हते. अशा वेळी वडिलांच्या सैन्यातील सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि तिच्या लग्नात कुटुंबीयांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. एवढंच नाही, तर लग्नाच्या खर्चासाठी तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांची मदतही केली. जवानांच्या या माणुसकीने उपस्थितांची मनं जिंकली.
दिवंगत जवानाच्या लेकीच्या लग्नाला पोहोचले सहकारी
समोर आलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील हरसोली गावात प्रीती नावाच्या तरुणीचं लग्न पार पडलं. प्रीतीचे वडील पप्पल सिंह हे भारतीय लष्कराच्या १६ जाट रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनामुळे प्रीतीच्या लग्नात त्यांची उणीव जाणवणं स्वाभाविक होतं. मात्र, पप्पल सिंह यांच्यासोबत सैन्यात काम केलेल्या सहकाऱ्यांनी या खास प्रसंगी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी १६ जाट रेजिमेंटचे अधिकारी, ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स (JCO) आणि जवान गणवेशात विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी प्रीतीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि लग्नसोहळ्यात सहभाग नोंदवला. याच ठिकाणी प्रीतीसोबत तिची चुलत बहीण पूजा हिचाही विवाह पार पडला.
वडिलांच्या जागी जवानांनी स्वीकारली जबाबदारी
लग्नाला आलेले जवान केवळ पाहुणे म्हणून उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी कुटुंबीयांसारख्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या. प्रीतीला विवाह मंडपापर्यंत सोबत नेलं आणि लग्नातील विविध विधींमध्ये सहभाग घेतला. सामान्यपणे वडील आणि भावांकडून पार पाडल्या जाणाऱ्या काही जबाबदाऱ्या या जवानांनी स्वीकारल्या. त्यांनी प्रीतीला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वादही दिले. आपल्या दिवंगत सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात अशा प्रकारे सहभागी होऊन जवानांनी पप्पल सिंह यांच्या कुटुंबाशी असलेलं नातं आजही कायम असल्याचं दाखवून दिलं.
लग्नासाठी दिली १ लाख ६१ हजारांची मदत
या सोहळ्यात जवानांनी केलेली आर्थिक मदतही विशेष ठरली. १६ जाट रेजिमेंटचे अधिकारी आणि जवानांनी एकत्र येऊन प्रीतीच्या लग्नासाठी १ लाख ६१ हजार रुपये जमा केले. ही रक्कम लग्नाच्या खर्चासाठी कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. जवानांनी केवळ आर्थिक मदत न करता लग्नात प्रत्यक्ष सहभागी होऊन कुटुंबाला आधार दिला. यावेळी प्रीतीची आई आणि दिवंगत हवालदार पप्पल सिंह यांच्या पत्नी अनिता देवी यांचाही शाल देऊन सन्मान करण्यात आला.
लेकीच्या पाठवणीवेळी वातावरण भावुक
लग्नातील सर्वात भावनिक क्षण प्रीतीच्या पाठवणीवेळी पाहायला मिळाला. लग्नानंतर मुलगी सासरी निघताना वडिलांची उपस्थिती आणि त्यांचे आशीर्वाद तिच्यासाठी विशेष असतात. मात्र, प्रीतीचे वडील या क्षणी तिच्यासोबत नव्हते. अशा वेळी त्यांच्या सैन्यातील सहकाऱ्यांनी प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांना आधार दिला. जवानांनी तिला आशीर्वाद देत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगामुळे कुटुंबीयांसह गावकरीही भावुक झाल्याचं माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
पप्पल सिंह यांच्या निधनानंतरही त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबाशी असलेलं नातं जपलं. लेकीच्या लग्नात त्यांनी दिलेली साथ आणि मदत यामुळे सैन्यातील सहकाऱ्यांमधील जिव्हाळ्याचं एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे.