रायपूर : आयपीएलमध्ये रविवारी सायंकाळी होणाऱ्या अन्य लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. बंगळुरूला सलग दोन लढतींमध्ये पराभव पत्करावा लागल्याने ते विजयपथावर परतण्यास आतुर असतील, तर यंदाच्या हंगामात रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर प्रथमच लढत होणार असल्याने मुंबईचे खेळाडू येथे चमकणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने १० पैकी ६ लढती जिंकल्या असून त्यांच्या खात्यात १२ गुण जमा आहेत. एकवेळ बंगळुरूने ८ पैकीच ६ सामने जिंकून अव्वल दोन संघांतील स्थान टिकवले होते. मात्र गुजरात व लखनऊकडून पराभूत झाल्यावर या संघाला काहीसा धक्का बसला आहे. तसेच हंगामापूर्वी केलेल्या करारानुसार बंगळुरूचा संघ घरच्या मैदानावरील दोन सामने आता रायपूरला खेळणार असल्याने येथील खेळपट्टी व वातावरण कसे असेल, याचा अंदाज बांधणे कठीण असेल. बंगळुरूने वानखेडेवर मुंबईला नमवले होते. आता मुंबईला एकाच हंगामात दुसऱ्यांदा धूळ चारण्यासाठी ते उत्सुक असतील.
गेल्या सामन्यात शून्यावर बाद झालेला विराट कोहली पुन्हा छाप पाडण्यास आतुर असेल. पाटीदार बंगळुरूच्या फलंदाजीचा कणा असून तो उत्तम लयीत आहे. मात्र मधल्या फळीतील अन्य फलंदाजांचे अपयश बंगळुरूला सतावत आहे. जेकब बेथल, जितेश शर्मा व रोमारिओ शेफर्ड यांना आणखी एक संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांची वेगवान जोडी बंगळुरूची ताकद आहे. रसिक दर व फिरकीपटू सूयश शर्मा सातत्याने स्वैर मारा करत आहेत.
दुसरीकडे मुंबईचे आव्हान जर-तरवर शाबूत असून गेल्या लढतीत त्यांनी हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत लखनऊला नमवले. रोहित शर्माने शानदार अर्धशतकी पुनरागमन केले. आता या सामन्यासाठी हार्दिकसह सूर्यकुमार यादवच्या उपलब्धतेबाबत संभ्रम आहे. रायन रिकल्टन व नमन धीर मुंबईसाठी सातत्याने धावा करत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, अल्लाह गझनफर व ट्रेंट बोल्ट यांच्यावर मुंबईची मदार आहे.
ऑरेंज कॅपसाठी सातत्याने संगीत खुर्ची
आयपीएलमध्ये गेल्या काही दिवसांपासून हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या ऑरेंज कॅपसाठी सातत्याने चुरस पाहायला मिळत आहे. सध्या हैदराबादच्या क्लासेनकडे (११ सामन्यांत ४९४ धावा) ऑरेंज कॅप असून त्याच संघाचा अभिषेक ४७५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा राहुल (४६८), हैदराबादचा किशन (४०९) हेसुद्धा फारसे पिछाडीवर नाहीत. वैभव, सॅमसन पाचव्या-सहाव्या स्थानी आहेत.
आयपीएल गुणतालिका
(दिल्ली वि. कोलकाता सामन्यापर्यंत)
वेळ : सायंकाळी ७.३० वा.