क्रीडा

रोहितचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपुष्टात? माजी क्रिकेटपटू, समालोचक आकाश चोप्राचा दावा

पुढच्या मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार नाही, अशा आशयाच्या चर्चा गेल्या कित्येक आठवड्यांपासून सुरू आहेत. त्यावर एकदा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही भाष्य केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पुढच्या मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार नाही, अशा आशयाच्या चर्चा गेल्या कित्येक आठवड्यांपासून सुरू आहेत. त्यावर एकदा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही भाष्य केले आहे. २०२५च्या मोसमात रोहितला मुंबई इंडियन्स रिटेन करणार नाही. त्यामुळे रोहितला संघात राहावे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल किंवा फ्रँचायझीला त्याला मुक्त करावे लागेल, असे आकाश चोप्राने म्हटले आहे.

चोप्राने रोहितच्या मुंबई इंडियन्समधील भवितव्याबाबत एका व्हिडियोद्वारे संवाद साधला. “रोहित मुंबई इंडियन्समध्ये राहणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र तो मुंबईकडून खेळणार नाही, असे मला वाटते. कोणताही संघ पुढील तीन वर्षांचे उद्दिष्ट लक्षात ठेवून, खेळाडूंना रिटेन ठेवण्याची रणनीती आखत असतो. महेंद्रसिंह धोनी त्याला अपवाद आहे. मात्र रोहितने स्वत:हून संघाबाहेर पडावे किंवा मुंबई इंडियन्सने त्याला मुक्त करावे, असे मला वाटते,” असे आकाश चोप्राने सांगितले.

“मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माला रिटेन करेल, असे वाटत नाही. यासंदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. पण मला वाटते की, त्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे. त्यामुळे त्याला मुक्त केले जाईल. तो लिलावातही दिसणार नाही, असे वाटते. कारण ट्रेंड विंडोच्या माध्यमातून तो मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो, असा अंदाजही आकाश चोप्राने व्यक्त केला आहे.

२०२४ मोसमाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेतले आणि त्याची कर्णधारपदी निवड केली. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर रोहित नाराज आहे.

सूर्यकुमारला धक्का नाही

रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव हेसुद्धा २०२५ मोसमाच्या मेगालिलावात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहितला आणखी दोन फ्रँचायझींनी कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. मात्र सूर्यकुमार कोणत्याही संघात जाणार नाही, तो मुंबई इंडियन्सकडूनच खेळेल, असा विश्वास आकाश चोप्राने व्यक्त केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी