मुंबई : भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माची गच्छंती करण्यात आल्याने सध्या क्रीडाविश्वात एकच वादंग सुरू आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी मालिका रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची एकदिवसीय मालिका ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यानंतर उभय संघांत ३ टी-२० सामनेही खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी शनिवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. मात्र ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. रोहित व विराट कोहली या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत. परंतु रोहित मात्र यावेळी फक्त खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
रोहितच्या नेतृत्वातच भारताने मार्च महिन्यात दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिळवले. त्या लढतीत रोहितने ७६ धावांची खेळी साकारून संघाला विजय मिळवून देतानाच सामनावीर पुरस्कारही पटकावला. त्यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका रद्द झाली. त्यामुळे आता थेट १९ ऑक्टोबरला भारतीय संघ सात महिन्यांनी एखादी एकदिवसीय लढत खेळणार आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार या संघात फक्त खेळाडू म्हणून असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. रोहितच्या नेतृत्वात गेल्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने फक्त एक सामना गमावला आहे.
रोहित व विराट यांनी गतवर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मग आयपीएल दरम्यान त्यांनी कसोटी प्रकारातूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकदा भारताकडून खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुर होते. मात्र २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी अद्याप २ वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत रोहित ४०, तर विराट ३८ वर्षांचा असेल. त्यामुळे विराटच्या तुलनेत रोहित त्या विश्वचषकापर्यंत संघात स्थान टिकवणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे.
“प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणीस सुरुवात केली आहे. त्यामुळेच गिलकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरी समाधानकारक नसली, तर कदाचित त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रोहितवर दडपण टाकण्यात येत असल्याचे चाहत्यांचे मत असून ते गंभीर व आगरकर यांच्यावर टीकाही करत आहेत.
दरम्यान, एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गिलला देण्याऐवजी मुंबईकर श्रेयस अय्यरला द्यायला हवे होते, असेही काहींचे मत आहे. मात्र तूर्तास १९ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेकडेच सर्वांचे लक्ष असेल.
रोहितच्या नेतृत्वात भारताची कामगिरी
एकदिवसीय विश्वचषक : उपविजेतेपद (२०२३)
टी-२० विश्वचषक : जेतेपद (२०२४)
चॅम्पियन्स ट्रॉफी : जेतेपद (२०२५)
आशिया चषक : जेतेपद (२०१८, २०२३)
महेंद्रसिंह धोनी वगळता भारताला तिन्ही आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत नेणारा रोहित हा एकमेव कर्णधार आहे.