मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने २९ जून, २०२४ रोजी बार्बाडोस येथे तिरंगा फडकावला. वर्षभरापूर्वी भारताने आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणून टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले. त्यानिमित्ताने भारताच्या त्यावेळचा टी-२० संघाचा कर्णधार रोहितने रविवारी आठवणींना उजाळा दिला. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
“जवळपास १३ वर्षांपूर्वी आम्ही एकदिवसीय विश्वचषक जिंकलो होतो. त्यानंतर आम्हाला टी-२० व एकदिवसीय विश्वचषकाने सातत्याने हुलकावणी दिली. त्यामुळे हा विश्वचषक खास आहे. २००७मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला, त्यावेळी मी त्या संघाचा सदस्य होतो. मात्र २०२४चा टी-२० विश्वचषक आणखी खास आहे. कारण यासाठी अनेक वर्षांची सर्व खेळाडूंची मेहनत जुळून आली,” असे रोहित म्हणाला.
भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. मुख्य म्हणजे एकवेळ आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावांची आवश्यकता असताना भारताने विजय मिळवला. विराट कोहलीने अर्धशतक साकारले, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग व हार्दिक पंड्या यांनी छाप पाडली होती. भारताने २००७ नंतर तो दुसरा टी-२० विश्वचषक जिंकला.
“६ चेंडूंत १६ धावांची गरज असताना मिलरने लगावलेला षटकार सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ झेलला. त्यावेळी मी लाँग ऑनला उभा होतो. ज्यावेळी चेंडू बॅटमधून निघाला, तेव्हा षटकारच जाईल असे वाटले. मात्र सूर्याने अफलातून झेल घेतला. तेथून आम्हाला पुन्हा प्रेरणा मिळाली,” असेही रोहितने नमूद केले. तसेच रोहितने जवळपास सर्व खेळाडूंचे नाव घेत त्यांचे संघातील महत्त्व अधोरेखित केले.
“विराटने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळी साकारली. संपूर्ण स्पर्धेत तो काहीसा चाचपडत होता. मात्र त्याने अंतिम फेरीत स्वत:चे महत्त्व सिद्ध केले. तसेच अक्षर पटेलने पाचव्या स्थानी फलंदाजीस येत निर्णायक खेळी साकारली. अनेकांचे त्या खेळीकडे लक्ष जात नाही. मात्र त्यामुळे आम्हाला मोठ्या धावसंख्येकडे जाण्याची प्रेरणा मिळाली,” असे रोहितने सांगितले.
भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत विजेतेपद मिळवले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने त्या जखमेवर मलम लावले गेले. त्यानंतर मार्च २०२५मध्ये रोहितच्याच नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले. रोहित, विराट व जडेजा टी-२०तून निवृत्त झाले आहेत. विराट व रोहितने तर कसोटीतूनही निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र २०२७चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून ते थाटात निवृत्त होण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षे प्रामुख्याने विराट व रोहितसाठी निर्णायक असतील. आफ्रिकेतच २०२७चा विश्वचषक रंगणार आहे.