विजय हजारे स्पर्धेत रोहित खेळणार; विराटबाबत संभ्रम संग्रहित छायाचित्र
क्रीडा

विजय हजारे स्पर्धेत रोहित खेळणार; विराटबाबत संभ्रम

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन्ही माजी कर्णधार तसेच तारांकित फलंदाज देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. किमान रोहित मुंबईचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे पक्के आहे. मात्र विराट दिल्लीकडून खेळणार की नाही, याविषयी संभ्रम आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन्ही माजी कर्णधार तसेच तारांकित फलंदाज देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. किमान रोहित मुंबईचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे पक्के आहे. मात्र विराट दिल्लीकडून खेळणार की नाही, याविषयी संभ्रम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ते डिसेंबर महिन्याच्या अखेरीस विजय हजारे स्पर्धा रंगणार आहे.

रोहित व विराट आता कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे फक्त एकदिवसीय प्रकारांतच ते दोघे भारताकडून खेळताना दिसतात. रोहित व विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. आता २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघातील स्थान टिकवण्यासह तंदुरुस्तीही कायम राखण्यासाठी दोघांना मेहनत घ्यावी लागणार आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले. तर विराटने अर्धशतक साकारले. रोहित सध्या तंदुरुस्तीवरही अधिक लक्ष देत असून त्याचे वजनही कमी झाले आहे. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने विजय हजारे स्पर्धेसाठी होकार दिला आहे, असे समजते.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका २५ ऑक्टोबर रोजी संपली. आता थेट ३० नोव्हेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळेल. या दरम्यानच्या काळात रणजी स्पर्धा सुरू आहे. रोहित-विराट त्या स्पर्धेत खेळणे गरजेचे नाही, कारण दोघेही कसोटीतून निवृत्त झाले आहेत. मात्र आफ्रिकेविरद्धची एकदिवसीय मालिका ६ डिसेंबरला संपणार असून भारताची पुढील एकदिवसीय मालिका थेट ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध असेल.

अशा स्थितीत २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत रोहित-विराट सहभागी होऊ शकतात. २४ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत मुंबईचा संघ तब्बल ७ सामने खेळणार आहे. तसेच दिल्लीचेही या काळात सात सामने होतील. त्यामुळे रोहित मुंबईकडून व विराट दिल्लीकडून किमान ३ ते ४ लढती खेळेल, असे अपेक्षित आहे.

गतवर्षी, रोहित-विराट रणजी स्पर्धेत आपापल्या संघाकडून एक सामना खेळले. मात्र मे महिन्यात दोघांनीही कसोटीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धेसह फक्त एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना रोहित-विराटला खेळताना पाहण्याची संधी मिळू शकते. आता त्यांच्या निर्णायकडे सर्वांचे लक्ष असेल.

एमसीएच्या पदाधिकाऱ्याकडून वृत्ताचे खंडन

रोहित विजय हजारे स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे वृत्त तूर्तास अद्याप खोटे असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. बुधवारी वानखेडे स्टेडियम येथे एमसीएची निवडणूक पार पडली. यासाठी माजी क्रिकेटपटू व क्लब मेंबर्स उपस्थित होते. याचवेळी रोहितच्या विजय हजारे स्पर्धेतील समावेशाविषयी विचारले असता एका पदाधिकाऱ्याने अद्याप असे कोणतेही वृत्त नसल्याचे सांगितले. रोहित सध्या मुंबईतच असून बीकेसी येथील मैदानात सराव करतानाची त्याची व्हीडीओसुद्धा वायरल होत आहे. त्यामुळे रोहित नेमका विजय हजारे स्पर्धेत खेळणार की नाही, याविषयी संभ्रम आहे.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश