Photo : X
क्रीडा

रोहित-विराटच्या निवृत्तीच्या चर्चा वायफळ! ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका अखेरची ठरण्याचे वृत्त BCCI ने फेटाळले

भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि तारांकित फलंदाज विराट कोहली यांच्या निवृत्तीची गेल्या दोन दिवसांत जोरदार चर्चा सुरू आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि तारांकित फलंदाज विराट कोहली यांच्या निवृत्तीची गेल्या दोन दिवसांत जोरदार चर्चा सुरू आहे. काही वृत्तसंस्था व संकेतस्थळांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका रोहित-विराटच्या आंतररराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची ठरू शकते. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ते भारतीय संघाचा भाग नसतील, असे वृत्त दिले होते. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने या सर्व अफवांचे खंडन केले. तसेच याप्रकारच्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असेही सांगितले.

३८ वर्षीय रोहित आणि ३६ वर्षीय विराट दोघेही मार्च महिन्यात चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत. दोघेही कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झाले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यापर्यंत भारताचा एकही एकदिवसीय सामना नाही. त्यामुळे आता थेट ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ जेव्हा एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल, तेव्हाच रोहित-विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होईल. दिवाळीच्या मुहूर्तावर १९ ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे.

दरम्यान, काही वृत्तसंस्थानी दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती व संघ व्यवस्थापन २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोहित-विराटचा विचार करत नाही आहेत, असे समजते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा या दोघांचा शेवटचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. तसेच निवड समितीने या दोघांना विजय हजारे स्पर्धेत खेळण्याचे बंधनकारक केले आहे, असेही वृत्त समोर आले. मात्र बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यानेच रविवारी याविषयी स्पष्ट भाष्य केले.

“रोहित-विराट जर निवृत्ती पत्करणार असतील, तर प्रथम ते कोणत्याही वृत्तसंस्थेऐवजी बीसीसीआयशी संपर्क साधतील. त्या दोघांपैकी कोणीही ऑस्ट्रेलिया दौरा शेवटचा असेल, असे सांगितलेले नाही. तसेच बीसीसीआयपैकी कुणीही २०२७च्या विश्वचषकासाठी त्यांचा विचार करण्यात आलेला नाही, असेही मत व्यक्त केलेले नाही. सध्या संघाचे व बीसीसीआयचे लक्ष्य २०२६चा टी-२० विश्वचषक आहे. त्यामुळे रोहित-विराटशी निगडीत अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे त्या पदाधिकाऱ्याने नमूद केले.

विराटच्या नावावर ३०२ एकदिवसीय सामन्यांत ५१ शतकांसह १४,१८१ धावा आहेत. तर रोहितने २७३ लढतींमध्ये ३२ शतकांसह ११,१६८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य व अंतिम फेरीत अनुक्रमे विराट आणि रोहितच सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले होते. यावरूनच एकदिवसीय संघातील त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात दक्षिण आफ्रिका येथे २०२७चा विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. तोपर्यंत रोहितने वयाची चाळीशी गाठलेली असेल, तर विराटही ३९ वर्षांच्या जवळ पोहोचेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांनंतर रोहित-विराट मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. १४ नोव्हेंबरपासून आफ्रिका भारत दौऱ्यावर येईल. यामध्ये प्रथम २ कसोटी, ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने असे स्वरूप असेल. १९ डिसेंबरला हा दौरा समाप्त होईल. मग जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने खेळणार आहे. २०२६च्या मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात येणार असल्याने सध्या टी-२० सामन्यांचे अधिक आयोजन करण्यावर आयसीसी व बीसीसीआयचा भर आहे. त्यामुळे विराट आणि रोहितसाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

विजय हजारे स्पर्धेत खेळणे अनिवार्य !

  • बीसीसीआयने गेल्या वर्षापासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत नसेल, तर त्याने त्यावेळी सुरू असलेल्या स्थानिक स्पर्धेत (रणजी, विजय हजारे, मुश्ताक अली) खेळणे गरजेचे आहे.

  • यंदा २४ डिसेंबरपासून विजय हजारे ही एकदिवसीय प्रकारातील देशांतर्गत स्पर्धा सुरू होईल. रोहित-विराटला स्वत:ची तंदुरुस्ती व फॉर्म टिकवण्यासाठी या स्पर्धेत खेळणे अनिवार्य असेल. मात्र त्यांना संपूर्ण स्पर्धा खेळता येणार नाही, असे समजते. कारण भारतीय संघ ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेविरुद्ध ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात ३ एकदिवसीय सामने खेळेणार आहे.

  • त्यानंतर ११ ते १८ जानेवारी या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात ३ एकदिवसीय सामने होतील. विजय हजारे स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारी रोजी असेल. त्यामुळे रोहित-विराट या स्पर्धेतील काही सामन्यांतच सहभागी होऊ शकतील.

सध्या फक्त टी-२० विश्वचषकाचे लक्ष्य

पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआय व निवड समितीचे सध्या पूर्ण लक्ष टी-२० विश्वचषकावरच आहे. या स्पर्धेसाठी संघात सर्वोत्तम १५ खेळाडूंची निवड करून ते पुढील ४-५ महिन्यांत कसे तंदुरुस्त राहतील, यास आमचे प्राधान्य असेल. त्यासाठी सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक निर्णायक ठरेल, असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. मुंबईचा सूर्यकुमार यादव भारताच्या टी-२० संघाचे विश्वचषकात कर्णधारपद भूषवणार आहे. ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक रंगणार आहे.

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

पेट्रोलियम पदार्थांच्या भेसळीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; HC ने व्यक्त केली चिंता

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत! दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करणार : बावनकुळे