IPL 2026 : दुसऱ्या स्थानासाठी जुगलबंदी; जयपूरमध्ये आज राजस्थान-गुजरात यांच्यात सातव्या विजयासाठी चढाओढ 
क्रीडा

IPL 2026 : दुसऱ्या स्थानासाठी जुगलबंदी; जयपूरमध्ये आज राजस्थान-गुजरात यांच्यात सातव्या विजयासाठी चढाओढ

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांत कडवा संघर्ष पाहायला मिळेल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीतील विजेता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी मजल मारू शकतो. त्यामुळेच चाहत्यांना दर्जेदार द्वंद्व अपेक्षित आहे.

Swapnil S

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांत कडवा संघर्ष पाहायला मिळेल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीतील विजेता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी मजल मारू शकतो. त्यामुळेच चाहत्यांना दर्जेदार द्वंद्व अपेक्षित आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे. यंदाचा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दरम्यान, रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने १० पैकी ६ लढती जिंकल्या असून तूर्तास ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत. एकवेळ राजस्थानने सुरुवातीचे चारही सामने जिंकले होते. मात्र त्यानंतरच्या सहा लढतींमध्ये त्यांना चार वेळा पराभव पत्करावा लागला. गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध राजस्थान पराभूत झाली. त्यामुळे आता उर्वरित चारपैकी किमान २ लढती जिंकणे त्यांना गरजेचे आहे. यासाठी त्यांची सर्वाधिक भिस्त वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीवर असेल. ध्रुव जुरेल व परागच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. डोनोवन फरेरा व शुभम दुबे मात्र धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर छाप पाडत असला, तरी त्याला अन्य गोलंदाजांकडून साथ लाभलेली नाही. फिरकीपटू रवी बिश्नोई व रवींद्र जडेजाकडून राजस्थानला कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातनेसुद्धा १० सामन्यांत ६ विजय मिळवले असून फक्त नेटरनरेटमुळे ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. गुजरातने सुरुवातीच्या सातपैकी तीन लढती जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर सलग तीन सामने जिंकून या संघाने लय मिळवली आहे. गिल, साई सुदर्शन व जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची भिस्त आहे. वॉशिंग्टन सुंदर व राहुल तेवतिया यांनी काही लढतींमध्ये चमक दाखवली. गोलंदाजी गुजरातची ताकद असून कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज व फिरकीपटू रशिद खान छाप पाडत आहेत. तसेच जेसन होल्डर अष्टपैलू योगदान देत असून त्याच्या समावेशामुळे गुजरात बळकट झाला आहे.

एकूणच प्रत्येक लढतीनंतर आता गुणतालिका रंगतदार होत असल्याने राजस्थान गुजरातवर यंदाच्या हंगामात सलग दुसरा विजय मिळवणार की गुजरात गुणतालिकेत झेप घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

उभय संघांत आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ६, तर राजस्थानने ३ लढती जिंकल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील लढतीत राजस्थानने गुजरातला नमवले होते. त्यामुळे आता गुजरात त्या पराभवाचा वचपा घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

खेळपट्टीचा अंदाज

जयपूरमध्ये आतापर्यंत दोन वेळा २२०हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग झाला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासच प्राधान्य देईल. खेळपट्टी क्रमांक सहावर लढत होणार असून यंदाच्या हंगामात या खेळपट्टीवर प्रथमच सामना होईल.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

SRA कायद्याचे ऑडिट करा, तज्ज्ञ समिती नेमा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत

व्यापार करार अधांतरी! भारत-अमेरिका व्यापार चर्चेचा वेग मंदावण्याची शक्यता

मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा निकाल १०० टक्के; सर्वाधिक ५९५ शाळा; ठाण्यात ४४२ शाळांची उल्लेखनीय कामगिरी