सेरेनाचे विम्बल्डनच्या एकेरीतही पुनरागमन; वयाच्या ४४व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज 
क्रीडा

सेरेनाचे विम्बल्डनच्या एकेरीतही पुनरागमन; वयाच्या ४४व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज

टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्सने व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केल्यानंतर अखेर तिच्या विम्बल्डन स्पर्धेतील सहभागावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Swapnil S

लंडन : टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्सने व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केल्यानंतर अखेर तिच्या विम्बल्डन स्पर्धेतील सहभागावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ऑल इंग्लंड क्लबने रविवारी अधिकृत घोषणा करत २३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीसाठी शेवटचे वाईल्ड कार्ड जाहीर केले आहे. आगामी गवत खाऱ्यावरील (ग्रास कोर्ट) ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होण्यास अवघे आठ दिवस शिल्लक असताना ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी सेरेना विम्बल्डनमध्ये केवळ एकेरीच नाही, तर तिची मोठी बहीण व्हीनस विल्यम्ससोबत दुहेरी सामन्यातही खेळताना दिसणार आहे. यासाठी तिने दुहेरी स्पर्धेचे वाईल्ड कार्ड आधीच स्वीकारले होते.

विम्बल्डन आयोजकांनी महिला एकेरीतील आठवे आणि अंतिम वाईल्ड कार्ड सेरेनाचा निर्णय होईपर्यंत राखून ठेवले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला बर्लिनमधील दुहेरीचा सामना गमावल्यानंतर सेरेना एकेरी खेळण्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसत होते. वाईल्ड कार्ड अद्याप शिल्लक असल्याचे समजल्यावर तिने आश्चर्य व्यक्त केले होते. वाईल्ड कार्ड ही स्पर्धा आयोजकांकडून माजी विजेते किंवा इतर खेळाडूंना मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यासाठी दिलेली विशेष निमंत्रणे असतात, ज्यासाठी आवश्यक पात्रता गुणांची अट नसते. सेरेनाने पत्रकार आणि तिची दुहेरीतील भागीदार कॅरोलिना मुचोव्हा यांच्याशी चर्चा करताना आपण एकेरीसाठी तयार आहोत का, असा प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावर झेक प्रजासत्ताकची खेळाडू मुचोव्हा हिने सेरेनाला एकेरीत रस असायला हवा, असे म्हटले होते.

सेरेनाच्या या पुनरागमनामुळे क्रीडाविश्वात उत्सुकता निर्माण झाली असून, इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर ती एकेरी सामन्यांच्या शारीरिक आव्हानांना कशी सामोरी जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सेरेना विल्यम्सने आपला शेवटचा एकेरी सामना २०२२ मधील युएस ओपन स्पर्धेत खेळला होता, जिथे तिसऱ्या फेरीत तिला अजला टोमलियानोविच कडून पराभव स्वीकारावा लागला होता.

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव