भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका : गिल, किशनचा शतकी तडाखा; अफगाणिस्तानचा फडशा  X : BCCI
क्रीडा

भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका : गिल, किशनचा शतकी तडाखा; अफगाणिस्तानचा फडशा

कर्णधार शुभमन गिलने (११० चेंडूंत १५४ धावा) साकारलेले दीडशतक आणि डावखुऱ्या इशान किशनने (७९ चेंडूंत १२५ धावा) झळकावलेल्या शतकाचा बुधवारी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना तडाखा बसला. त्यामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा १७० धावांनी धुव्वा उडवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

Swapnil S

लखनऊ : कर्णधार शुभमन गिलने (११० चेंडूंत १५४ धावा) साकारलेले दीडशतक आणि डावखुऱ्या इशान किशनने (७९ चेंडूंत १२५ धावा) झळकावलेल्या शतकाचा बुधवारी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना तडाखा बसला. त्यामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा १७० धावांनी धुव्वा उडवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शनिवारी तिसरी लढत खेळवण्यात येईल.

लखनऊच्या इकाना स्टेडियमवरील कडक उन्हात झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.५ षटकांत सर्व बाद ४०२ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ४४.३ षटकांत २३२ धावांवर गारद झाला. वेगवान गोलंदाज गुर्नूर ब्रार व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३, तर पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने २ बळी मिळवले. गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्या लढतीत भारताने ७ गडी व १३ चेंडूं राखून विजय मिळवला होता.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा अफगाणिस्तानचा निर्णय पूर्णपणे चुकला. गिल आणि किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या १४१ चेंडूंमध्ये २२४ धावांची स्फोटक भागीदारी रचली. गिलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील नववे शतक झळकावले. तीव्र उष्णतेमुळे गिलने आईस कॉलर घालून फलंदाजी केली आणि बाद झाल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. किशनने डिसेंबर २०२२मधील द्विशतकानंतरचे आपले पहिले आणि कारकिर्दीतील दुसरे एकदिवसीय शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत अनेक उत्कृष्ट चौकार आणि दोन एकहाती षटकार ठोकले.

भारताने शेवटच्या १० षटकांत ७ विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानकडून डाव्या हाताचा फिरकीपटू नांगेयालिया खरोटेने ७६ धावांत ४ बळी घेतले, तर रशिद खानने ३ गडी बाद केले. यापूर्वी भारताने प्रयोगाचा भाग म्हणून रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वालला (४) सलामीला पाठवले होते, तर गिल तिसऱ्या क्रमांकावर आला होता. रोहित शर्मा ४८ धावा करून रशिद खानच्या गुगलीवर बाद झाला.

४०३ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांमध्ये आवश्यक असलेला वेग दिसला नाही. रहमत शाहने सर्वाधिक ७९ धावांची झुंजार खेळी केली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाझने ४१ आणि इब्राहिम झादरानने २१ धावा केल्या. गुरबाझला सामन्यात एक जीवदान मिळाले होते, जेव्हा पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने त्याचा झेल घेतला, मात्र तो चेंडू नो-बॉल ठरल्याने प्रिन्सची कारकिर्दीतील पहिली विकेट हुकली.

मात्र, ब्रारने ११ चेंडूंनंतर गुरबाझला बाद केले. दरविश रसुली भारताच्या डावा दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, तो फलंदाजीला आला खरा पण स्नायूंच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. पदार्पण करणाऱ्या प्रिन्सने ५६ धावांत २ बळी घेतले. दुसरीकडे भारत-अ संघानेदेखील अफगाणिस्तान-अ संघाला तिरंगी मालिकेत नमवले. त्यामुळे एकाच दिवसात भारताने दोन ठिकाणी अफगाणिस्तानला धूळ चारली.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९.५ षटकांत सर्व बाद ४०२ (शुभमन गिल १५४, इशान किशन १२५; नांगोलिया खरोटे ४/७६) विजयी वि.

अफगाणिस्तान : ४४.३ षटकांत सर्व बाद २३२ (रहमत शाह ७९, सेदिउल्ला अटल ४२; गुर्नूर ब्रार ३/६०)

उकाड्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी; दुपारच्या सत्रात शाळा नको

पतीच्या हयातीत घटस्फोटीत पत्नीला वाढीव पोटगी मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

अमेरिकेचा मोठा निर्णय! 'इंडो-पॅसिफिक कमांड' नावातून 'इंडो' शब्द वगळला; पुन्हा केले 'यूएस पॅसिफिक कमांड'

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक; बोरघाटमार्गे मुंबई वाहिनीवरील सर्व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद

खुल्या कारागृहांच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारची समिती; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय