मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड याची मुंबई संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी लाडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये शार्दुल हा मुंबईचा मुख्य गोलंदाज असल्याने त्याच्यावरील खेळाचा ताण नियंत्रित करण्यासाठी (वर्कलोड मॅनेजमेंट) कर्णधारपदात बदल करण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) घेतला आहे. मुंबईचा संघ सलग दुसऱ्या हंगामात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात अजिंक्य राहणेऐवजी शार्दुलकडे कमान सोपवण्यात आली होती. राहणेने नुकताच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
३४ वर्षीय सिद्धेश लाडने गेल्या रणजी हंगामात चमकदार कामगिरी करताना ८ सामन्यांत ७७.४०च्या सरासरीने ७७४ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ५ शतके आणि १ अर्धशतकाचा समावेश होता. यंदा रणजी हंगामाची सुरुवात ११ ऑक्टोबरपासून होणार असून ड-गटात असलेल्या मुंबईचा पहिला सामना चंडीगडविरुद्ध रंगणार आहे. या गटात हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, रेल्वे, तमिळनाडू, उत्तराखंड हे संघही आहेत.
सूर्यकुमार, श्रेयस शर्यतीत
मर्यादित षटकांच्या (पांढऱ्या चेंडूच्या) देशांतर्गत स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्याकडे उपलब्धतेनुसार कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळाडूंच्या उपलब्धतेवर कर्णधारपद अवलंबून असेल, असे एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या टी-२० विश्वचषकानंतर श्रेयसने सूर्यकुमारच्या जागी भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते.