ऋषिकेश बामणे/मुंबई
बहुप्रतीक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातील १५ शिलेदारांची नावे शनिवारी जाहीर करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात काहींचे पुनरागमन झाले आहे, तर काहींना धक्केसुद्धा बसले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेला संघच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. रोहित आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे संयुक्तपणे चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळणार आहे. अ-गटात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. २० तारखेला भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध पहिली, तर २३ तारखेला पाकिस्तानविरुद्ध दुसरी लढत खेळणार आहे. त्यानंतर २ मार्चला भारत-न्यूझीलंड सामना रंगेल. त्यापूर्वी ६ फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
दरम्यान, ३१ वर्षीय बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अवघ्या १३.०६च्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. बुमराने या मालिकेत १५०हून अधिक षटके गोलंदाजी केली. भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. मात्र बुमराच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिडनी येथील पाचव्या कसोटीत बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पाठदुखीमुळे दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजीसाठी आला नाही. पहिल्या डावातच गोलंदाजीच्या वेळेस त्याची पाठ दुखू लागल्याने स्टेडियम सोडून तो स्कॅन करण्यासही गेला होता. सध्याच्या माहितीनुसार बुमराची पाठदुखी ग्रेड-२ किंवा ग्रेड-३ स्वरूपातील असल्याचे समजते. त्यामुळे तो थेट फेब्रुवारीच्या अखेरीस खेळण्यासाठी उपलब्ध असू शकतो. मात्र आगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुमरा इंग्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी अनुपलब्ध असेल, असे समजते. त्यानंतर उर्वरित सामन्यासाठी तो येईल, अशी आशा आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बुमराची एनसीए येथे तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे.
“चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करताना आनंद होत आहे. बुमरा पहिल्या दोन सामन्यांसाठी अनुपलब्ध असून त्याची पाठदुखी कितपत गंभीर आहे, हे बीसीसीआयच अधिकृतपणे जाहीर करेल. १३ फेब्रुवारीपर्यंत आमच्याकडे संघात बदल करण्याची मुभा आहे. त्यामुळे बुमराविषयीचा निर्णय पुढील काही आठवड्यांत घेतला जाईल,” असे आगरकर म्हणाले. तसेच बुमरासाठी हर्षित राणाला पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे, असेही आगरकर यांनी सांगितले.
तसेच सिराजला वगळताना त्यांनी तो नंतरच्या षटकांत तितका प्रभावी ठरत नसल्याचे सांगितले. त्यामुळे अर्शदीप सिंगला प्राधान्य देण्यात आले. यशस्वी जैस्वालला तिसरा सलामीवीर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. शमी व कुलदीप यादव एकदिवसीय संघात परतले आहेत. एकंदर भारताचा संघ समतोल असून बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त असल्यस पुन्हा एकदा जेतेपदाच्या आशा वाढतील.