जोहान्सबर्ग : सलामीवीर सईम अयूबने (९४ चेंडूंत १०१ धावा) मालिकेतील दुसरे शतक साकारल्याने पाकिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ३६ धावांनी पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. घरच्या मैदानात प्रथमच आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत व्हाइटवॉश पत्करावा लागला.
वँडरर्स स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील तिसऱ्या सामन्यात पावसामुळे काही षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४७ षटकांत ९ बाद ३०८ धावा केल्या. पहिल्या लढतीत शतक झळकावणाऱ्या अयूबने यावेळी १३ चौकार व २ षटकारांसह एकंदर तिसरे शतक साकारले. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान (५३) व बाबर आझम (५२) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. तसेच सलमान अघाने ३३ चेंडूंत ४८ धावा फटकावल्या. कगिसो रबाडाने ३ बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ४२ षटकांत २७१ धावांत गारद झाला. हेनरिच क्लासेनने ४३ चेंडूंत ८१ धावांची झंझावाती खेळी साकारली. मात्र त्याला अन्य कुणाची फारशी साथ लाभली नाही. कोर्बिन बॉश (नाबाद ४०) व रासी व्हॅन डर दुसेन (३५) यांनी काहीसा प्रतिकार केला. डावखुरा फिरकीपटू सुफियान मुकीमने ४ बळी मिळवले. अयूब सामनावीर तसेच ३ लढतींमध्ये सर्वाधिक २३५ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला. पहिल्या लढतीत पाकिस्तानने ३ गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात ८१ धावांनी आफ्रिकेला धूळ चारली होती. पाकिस्तानने सलग तिसरी एकदिवसीय मालिका जिंकली, हे विशेष. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांची उत्तम तयारी सुरू आहे.
उभय संघांतील टी-२० मालिकेत आफ्रिकेने २-० अशी सरशी साधली. तर आता एकदिवसीय मालिका पाकिस्तानने जिंकली. २६ डिसेंबरपासून २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार असून आफ्रिकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठण्यासाठी एक लढत जिंकणे गरजेचे आहे.