Twitter
क्रीडा

वंडरसेसमोर टीम इंडिया निष्प्रभ; दुसऱ्या वनडेत भारताचा ३२ धावांनी पराभव

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली.

Swapnil S

कोलंबो : जेफ्री वंडरसेच्या फिरकीसमोर रोहित शर्मा वगळता भारताचे अन्य फलंदाज निष्प्रभ ठरले, त्यामुळे एक वेळ मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अक्षर पटेलने थोडा फार प्रतिकार केला, परंतु विजयासाठी तो अपुरा ठरला. चांगली सुरुवात करूनही भारताने हा सामना ३२ धावांनी गमावला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली.

श्रीलंकेने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ४२.२ षटकांत सर्वबाद २०८ धावाच करता आल्या. कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याला शुभमन गिलने संयमी साथ दिली. सलामीवीरांनी ९७ धावांची भागीदारी रचत छान सुरुवात केल्याने भारताने सामन्यावर पकड मिळवली होती. सलामीची ही जोडी शतकाच्या उंबरठ्यावर असताना रोहित शर्माला फटक्यांचा मोह अनावर झाला. वंडरसेच्या गोलंदाजीवर रोहित आपली विकेट गमावून बसला. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीला जी गळती लागली ती शेवटपर्यंत रोखून धरण्यात भारतीय फलंदाजांना अपयश आले. अक्षर पटेलने एकाकी झुंज दिली. परंतु त्याची ४४ धावांची खेळी विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. श्रीलंकेकडून वंडरसेने सहा बळी मिळवले.

तत्पूर्वी, अविष्का फर्नांडो (४० धावा) आणि कामिंडू मेंडिस (४०) आणि दुनिथ वेलालागे (३९) यांच्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ९ बाद २४० धावा केल्या होत्या. भारताकडून वॉशिंग्टनने ३, तर कुलदीपने २ फलंदाजांना माघारी धाडले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस