क्रीडा

भारताच्या 'या' स्नूकरपटू खेळाडूने पटकावले २५ वे अजिंक्यपद

वृत्तसंस्था

भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने मलेशियातील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये बिलियर्ड्सच्या अंतिम फेरीत सौरव कोठारीचा ४-० असा पराभव करून कारकिर्दीतील २५ व्या जागतिक करंडकावर नाव कोरले.

अडवाणीने चमकदार खेळ करत कोठारीला कोणतीही संधी दिली नाही. पहिल्याच फ्रेमपासून त्याने वर्चस्व गाजविण्यास सुरूवात केली. कोठारीची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्याने केवळ ७२ गुण मिळविले; तर अडवाणीने ६६० हून अधिक गुण मिळवत अजिंक्यपद पटकाविले.

१५० पेक्षा जास्त प्रकारामध्ये अडवाणीने १४९ च्या ब्रेकसह पहिली फ्रेम घेतली. कोठारीला तोपर्यंत खातेही उघडण्यातही यश आले नव्हते.

दुसऱ्या फ्रेममध्ये कोठारीला काही संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा त्याला उठविण्यात त्याला अपयश आले. अडवाणीने ७७ च्या ब्रेकच्या मदतीने २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर अडवाणीचा खेळ आणखी बहरत गेला. त्याच्या जबरदस्त खेळाने मलेशियाचे प्रेक्षकही थक्क झाले.

तिसऱ्या फ्रेममध्ये अडवाणीने १५३ धावांचा स्पर्धेतील सर्वोच्च ब्रेक केला. आता तो विजेतेपदापासून केवळ एक फ्रेम दूर होता. चौथ्या फ्रेममध्ये ८० आणि ६० असे दोन ब्रेक घेत अडवाणीने चषकावर नाव कोरले.

बेस्ट ऑफ सेव्हन अंतिम सामन्यामध्ये अडवाणीने सुरुवातीपासूनच सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा बिलियर्ड्समधील राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला.

कोविड-१९ मुळे आतापर्यंत बिलियर्ड्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन होऊ शकले नव्हते. २०१९ मध्ये शेवटची वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळली गेली होती. अडवाणीने याआधी १२ महिन्यांपूर्वी कतारमध्ये शेवटची वर्ल्ड ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्याने आयबीएसएफ ६-रेड स्नूकर वर्ल्ड कपमध्ये चषक जिंकला होता.

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

ठाण्यात महायुतीच्या रॅलीत राडा; दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ तणाव

"...मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही", अजित पवार यांचा विरोधकांना इशारा

कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी; माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

प्रादेशिक असमतोलाचे भान राखणे गरजेचे!