नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय टेनिस संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आल्याने नवा विवाद निर्माण झाला आहे. मानस धामणे, वैष्णवी अडकर, सहज यमलापल्ली, वैदेही चौधरी आणि प्रार्थना ठोंबरे या खेळाडूंचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) पाठवलेल्या अंतिम यादीत समावेश नव्हता, अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) सूत्रांनी दिली. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) ही यादी पाठवली होती, असेही साइने स्पष्ट केले.
वगळण्यात आलेले खेळाडू आशियाई क्रमवारीत अव्वल आठ खेळाडूंमध्ये येत नसल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आले नाही. यात मानस धामणे (पुरुष एकेरी), वैष्णवी अडकर व सहज यमलापल्ली (महिला एकेरी), तसेच वैदेही चौधरी व प्रार्थना ठोंबरे (महिला दुहेरी) यांचा समावेश आहे. या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहता पदकाची शक्यता कमी असल्याचे साइच्या सूत्रांनी नमूद केले.
दुसरीकडे, एआयटीएने या दाव्यांचे खंडन केले आहे. आयओएचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांच्याकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती, असे एआयटीएचे सरचिटणीस सुंदर अय्यर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रात खेळाडूंच्या निवडीबाबत स्पष्ट पाठपुरावा केला होता, त्यामुळे नावे दिली नाहीत हा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
खेळाडूंना डावलण्याच्या या निर्णयावर दोन वेळचा आशियाई खेळ सुवर्णपदक विजेता रोहन बोपण्णा याने तीव्र शब्दांत टीका केली आहे. टेनिस कोर्टवर कधीही न खेळलेल्या समितीने कागदावर खेळाडूंचे भवितव्य ठरवले आहे, असे सांगत हा निर्णय क्रीडा संस्कृतीच्या विरोधात असल्याचे बोपण्णा म्हणाला. भारतातील क्रमांक एकची महिला खेळाडू सहज यमलापल्ली (जागतिक क्रमवारी ३४४) आणि क्रमांक दोनची वैष्णवी अडकर (जागतिक क्रमवारी ३८८) यांना अशा प्रकारे वगळणे योग्य नाही, असेही त्याने नमूद केले.
या वादावर उत्तर देताना क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी आयटीएफ आणि चॅलेंजर स्पर्धा असतात, एशियन गेम्स हे सराव करण्याचे ठिकाण नाही. मंत्रालयाच्या धोरणानुसार एकेरीसाठी आशियातील अव्वल ६ आणि दुहेरीसाठी अव्वल ८ क्रमवारीचा निकष अनिवार्य आहे. या नियमात कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही.
एकूणच आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ३९ पदके पटकावली होती. २०२३च्या आशियाई स्पर्धेत भारताने पदकांचे शतक साकारले होते. त्यामुळे २०२६मध्येही तशीच अपेक्षा क्रीडापटूंकडून आहे.
दबावापुढे क्रीडा मंत्रालय झुकणार नाही
जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या निवड निकषांची पूर्तता न करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विविध स्तरांवरून पडणाऱ्या दबावाला न जुमानता क्रीडा मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई खेळांसाठी क्रीडा मंत्रालयाने ४९२ खेळाडूंच्या पथकाला मंजुरी दिली आहे. यात ७३ खेळाडूंसह ॲथलेटिक्सचा सर्वात मोठा वाटा आहे.
काही अतिरिक्त खेळाडूंच्या समावेशाबाबत आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. मात्र, गतवर्षी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या निवड निकषांचे उल्लंघन करून कोणताही समावेश केला जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. काही खेळाडूंच्या पालकांनी भेट घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु निकषात बसणाऱ्या खेळाडूंची निवड रोखली जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.