न्यूयॉर्क : गतविजेत्या कार्लोस अल्कराझला बुधवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्या आठव्या मानांकित बेन शेल्टनने स्पेनच्या दुसऱ्या मानांकित अल्कराझवर तब्बल पाचव्या सेटच्या टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्यपूर्व सामन्यात ६-७ (५-७), ६-१, ६-३, १-६, ७-६ (१०-७) अशी सरशी साधली.
आर्थर ॲश स्टेडियमवरील ही लढत तब्बल ४ तास, २८ मिनिटे रंगली. तेथील वेळेनुसार मध्यरात्री ३ वाजून ३३ मिनिटांनी सामना संपला. त्यामुळे स्पर्धा इतिहासातील ही सर्वात उशिरा संपलेली लढत ठरली. भारतीय वेळेनुसार सकाळी ९च्या सुमारास ही लढत सुरू झाली व १.३०च्या आसपास संपली. या विजयासह २३ वर्षीय शेल्टनने दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठली. २०२३मध्ये तो उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. यंदा शेल्टनसमोर उपांत्य फेरीत अमेरिकेच्याच ११व्या मानांकित फ्रान्सेस टियाफोचे आव्हान असेल.
अल्कराझला नमवल्यानंतर शेल्टनला भावनांना आवर घालणे कठीण गेले. “मी थकलोय आणि हा एक महासंग्राम होता. कार्लोस हा चॅम्पियन खेळाडू असून माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात आनंददायी सामना आहे,” असे शेल्टन म्हणाला. या पराभवामुळे ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील अल्कराझची १८ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. दुखापतीतून सावरत चार महिन्यांनी पुनरागमन करणारा अल्कराझ म्हणाला की, “हा सामना अतिशय रोमहर्षक होता आणि शेवटी विजय न मिळाल्याबद्दल मी निराश आहे. परंतु मी ज्या प्रकारे लढा दिला त्याबद्दल मला स्वतःचा अभिमान आणि आनंद आहे. शारीरिकदृष्ट्या मी खूप थकलो होतो.”
या विजयामुळे अमेरिकेचा प्रतिनिधी रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत खेळणार हे निश्चित झाले असून २००३ मध्ये अँडी रॉडिकने येथे विजेतेपद पटकावल्यानंतर अमेरिकेला पुरुष गटात पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी अल्कराझने २०२२च्या उपांत्यपूर्व फेरीत सिनरविरुद्ध पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी संपलेला सामना खेळला होता, ज्या मार्गावर त्याने वयाच्या १९व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते.
टियाफोची पिछाडीवरून मुसंडी
अमेरिकेच्या ११व्या मानांकित टियाफोने दोन सेट पिछाडीवर पडल्यानंतर आणि पाचव्या सेटमध्ये ०-३ अशी पिछाडी असतानाही जोरदार मुसंडी मारत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. टियाफोने हा सामना ४ तास ३८ मिनिटांत ५-७, ३-६, ७-५, ६-३, ७-६ (१०-६) अशा सेटमध्ये जिंकत अॅलेक्स माइकलसेनचा पराभव केला. सामन्यानंतर टियाफोने धावत जाऊन २२ वर्षीय माइकलसेनला आलिंगन दिले. कारण त्याच्यासाठी कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीचा हा दुर्दैवी शेवट ठरला. टियाफोने यापूर्वी २०२२ आणि २०२४ मध्ये अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.