अमेरिकन ओपन टेनिस : अल्कराझचे यशस्वी पुनरागमन; वॉवरिंकाचा पराभवासह अलविदा X
क्रीडा

अमेरिकन ओपन टेनिस : अल्कराझचे यशस्वी पुनरागमन; वॉवरिंकाचा पराभवासह अलविदा

मनगटाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरून दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कार्लोस अल्कराझने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी पुनरागमन केले आहे. त्याशिवाय महिलांमध्ये जपानची नाओमी ओसाका, बेलारूसची आर्यना सबालेंका यांनीही विजयी सलामी नोंदवली.

Swapnil S

न्यूयॉर्क : मनगटाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरून दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कार्लोस अल्कराझने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी पुनरागमन केले आहे. त्याशिवाय महिलांमध्ये जपानची नाओमी ओसाका, बेलारूसची आर्यना सबालेंका यांनीही विजयी सलामी नोंदवली. मात्र अनुभवी स्टॅनिस्लास वॉवरिंकाला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित २३ वर्षीय स्पॅनिश खेळाडू अल्कराझने पहिल्या फेरीत रोमन साफीउलीनचा ६-४, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. एप्रिल महिन्यापासून उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे कोर्टपासून दूर असलेल्या अल्कराझने अर्थर ॲश स्टेडियमवर प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरारात आपला विजय साजरा केला. पहिल्या फेरीच्या या लढतीनंतर अल्कराझने कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

“कोर्टवर पुन्हा स्पर्धात्मक टेनिस खेळायला मिळाल्याचा मला मनापासून आनंद आहे. पहिल्या सामन्यातील खेळाच्या दर्जाबाबत मी समाधानी असून पुढील सामन्यांमध्ये माझा खेळ आणखी सुधारेल,” असा विश्वास सात वेळेच्या ग्रँडस्लॅम विजेत्या अल्कराझने व्यक्त केला. अव्वल मानांकित यानिक सिन्नर गुढघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर असून, २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी असलेला नोव्हाक जोकोव्हिच पहिल्या फेरीत पराभूत झाल्यामुळे अल्कराझचे जेतेपदाचे दावेदारपण अधिक मजबूत झाले आहे.

महिला एकेरीत दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या सबालेंकानेही विजयी सुरुवात केली. सबालेंकाने कॅमिला ओसोरिओचा ६-४, ६-४ असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याच्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. २०१२ ते २०१४ दरम्यान सेरेना विल्यम्सने सलग तीनदा हे जेतेपद पटकावले होते, त्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे सबालेंकाचे लक्ष्य आहे.

२०१६च्या अमेरिकन ओपनचा विजेता वावरिंका याच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा अखेर पराभवाने अंत झाला. पहिल्या फेरीच्या सामन्यात इटलीच्या मॅटेओ बेरेतिनीने वावरिंकाचा ७-६ (४), ७-६ (३), ६-० असा पराभव केला. ४१ वर्षीय वावरिंकासाठी हा हंगाम अखेरचा ठरणार असून त्याने यापूर्वीच या वर्षी निवृत्त होण्याची घोषणा केली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा