न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तसेच कॅरेन खाचानोव्ह, आर्यना सबालेंका, कोको गॉफ यांनीही आगेकूच केली.
बुधवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झ्वेरेव्हने बोटीक वॅन डी झँडस्कल्पचा ६-२, ७-५, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह झ्वेरेव्हने या हंगामातील सर्व चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याचा पराक्रम केला आहे. फ्रेंच ओपन विजेता आणि विम्बल्डन उपविजेता असलेला झ्वेरेव्ह आता शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत कॅरेन खचानावविरुद्ध मैदानात उतरेल.
दुसऱ्या उपांत्य फेरीत अमेरिकेचा बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो आमनेसामने असतील. १९६८ मध्ये ओपन एरा सुरू झाल्यापासून कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पाच संचांचे सामने खेळणारा झ्वेरेव्ह हा पहिला अव्वल मानांकित पुरुष खेळाडू ठरला आहे. मात्र, त्यानंतरचे तिन्ही सामने त्याने सरळ संचांमध्ये जिंकले असून, या वर्षी चारही ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
“इतर स्पर्धांमध्ये मी पहिल्याच फेरीत बाहेर पडलो असतो, पण येथे मी पुनरागमन करू शकलो आणि साडेचार तास लढून विजय मिळवला. त्यानंतर खेळाचा दर्जा उंचावला असून उपांत्य फेरीत पोहोचल्याचा आनंद आहे,” असे झ्वेरेव्हने सांगितले. या मोसमात ग्रँडस्लॅम सामन्यांमध्ये त्याचा विक्रम २३-२ असा आहे.
दुसऱ्या बाजूला, रशियाच्या २८व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हने बेल्जियमच्या अलेक्झांडर ब्लॉकक्सचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्लॉकक्सला पाय आणि पाठीच्या दुखापतीमुळे तिसऱ्या सेटमध्ये सामना सोडून द्यावा लागला. खाचानोव्हने पहिले दोन सेट ६-२, ७-५ असे जिंकले होते आणि तिसऱ्या संचात ३-२ अशी आघाडी घेतली असताना ब्लॉकक्सने माघार घेतली.