दुबईत वैभव सूर्यवंशीचे दीडशतकी वादळ; भारतीय युवा संघाचा विजयारंभ; अमिरातीचा तब्बल २३४ धावांनी फडशा Photo-X
क्रीडा

दुबईत वैभव सूर्यवंशीचे दीडशतकी वादळ; भारतीय युवा संघाचा विजयारंभ; अमिरातीचा तब्बल २३४ धावांनी फडशा

दुबईत शुक्रवारी १४ वर्षीय प्रतिभावान फलंदाज वैभव सूर्यवंशीचे दीडशतकी वादळ घोंघावले. वैभवने ९५ चेंडूंत फटकावलेल्या १७१ धावांच्या बळावर भारतीय युवा संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ करताना संयुक्त अरब अमिरातीचा २३४ धावांनी फडशा पाडला.

Swapnil S

दुबई : दुबईत शुक्रवारी १४ वर्षीय प्रतिभावान फलंदाज वैभव सूर्यवंशीचे दीडशतकी वादळ घोंघावले. वैभवने ९५ चेंडूंत फटकावलेल्या १७१ धावांच्या बळावर भारतीय युवा संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ करताना संयुक्त अरब अमिरातीचा २३४ धावांनी फडशा पाडला. आयपीएलपासून लक्षवेधी कामगिरी करणारा वैभव त्यामुळे सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

आयसीसी अकादमीच्या मैदानात झालेल्या अ-गटातील या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात अमिरातीला ५० षटकांत ७ बाद १९९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पृथ्वी मधू (५०) व उदिश सुरी (नाबाद ७८) यांनी अमिरातीकडून एकाकी झुंज दिली. मध्यमगती गोलंदाज दीपेश देवेंद्रने २ बळी मिळवले. याबरोबरच भारताने अ-गटात २ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. पाकिस्तान सरस धावगतीमुळे अग्रस्थानी आहे. रविवारी भारताची पाकिस्तानशीच दुसऱ्या सामन्यात गाठ पडेल.

पुढील वर्षी १५ जानेवारीपासून नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे १९ वर्षांखालील युवांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी आशियाई खंडातील देशांना सराव व्हावा, या हेतूने दुबईत युवा आशिया चषक खेळवण्यात येत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, अमिराती व मलेशिया अ-गटात, तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेपाळ ब-गटात आहेत. मुंबईच्या १८ वर्षीय आयुष म्हात्रेकडे या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पहिल्या साखळी लढतीत अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने आयुषला (४) स्वस्तात गमावले. मात्र वैभवने तिसऱ्या क्रमांकावरील आरोन जॉर्जसह (६९) दुसऱ्या विकेटसाठी तब्बल २१२ धावांची भागीदारी रचली. वैभवने ९ चौकार व १४ षटकारांची आतषबाजी केली. ३३व्या षटकात वैभव बाद झाल्यावर उपकर्णधार विहान मल्होत्रा (६९), वेदांत त्रिवेदी (३८), अभिग्यान कुंडू (नाबाद ३२) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे भारताने चारशे धावांचा पल्ला गाठला.

मुख्य म्हणजे गेल्या तिन्ही स्पर्धांमध्ये वैभवने शतक साकारले आहे. रायझिंग स्टार स्पर्धेत त्याने अमिरातीविरुद्धच ४२ चेंडूंत १४४ धावा तडकावल्या. मग मुश्ताक अली स्पर्धेत बिहारसाठी ६१ चेंडूंत १०८ धावा केल्या. आयपीएलमध्ये वैभवने राजस्थानकडून खेळताना सर्वात युवा शतकवीर ठरण्याचा मानही मिळवला होता.

वैभवने (१७१) १९ वर्षांखालील एकदिवसीय प्रकारात भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी साकारली. अंबाती रायुडूने २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध १७७ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ६ बाद ४३३ (वैभव सूर्यवंशी १७१, आरोन जॉर्ज ६९, विहान मल्होत्रा ६९; युग शर्मा २/७५) विजयी वि.

अमिराती : ५० षटकांत ७ बाद १९९ (उदिश सुरी नाबाद ७८; दीपेश देवेंद्र २/२१)

Mumbai : आता कार्यालयावरून रस्सीखेच! शिंदेसेनेला पश्चिमेला दरवाजा असलेले कार्यालय नकोसे; म्हणे - वास्तुदोष निर्माण होण्याची भीती

Mumbai : रेल्वेने अडवला बेलासीस पुलाचा मार्ग! मुदतीआधीच बांधकाम पूर्ण; पण, 'ना-हरकत प्रमाणपत्र' नाही

Mumbai : नवे बूट ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी; पाय, कंबरेची दुखणी

Mumbai : लोकलमधील जागेवरील वादातून प्रवाशाची गाडीवर दगडफेक; एकाच्या डोळ्याला इजा; तरुणाला अटक

जिप, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान; ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार