बंगळुरू : १५ वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपली कामगिरी सुधारण्याची उत्तम संधी चालून आली आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत रविवारी पूर्व विभागाचा सामना अननुभवी उत्तर-पूर्व विभागाशी होणार आहे.
सूर्यवंशीने बिहारसाठी आठ प्रथम श्रेणी सामन्यांतील १२ डावांत १७च्या सरासरीने धावा केल्या असून ९३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पूर्व विभागात कर्णधार ईशान किशन, मोहम्मद शमी, अभिमन्यू ईश्वरन आणि मुकेश कुमार असे अनुभवी खेळाडू असतानाही उपकर्णधारपद मिळालेला सूर्यवंशी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. या स्पर्धेतील कामगिरीवरून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुद्दुचेरी येथे होणाऱ्या 'ऑस्ट्रेलिया अ' संघाविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी 'भारत अ' संघाची निवड केली जाणार आहे.
'बीसीसीआय'ने २०२५-२६ मोसमापासून दुलीप ट्रॉफीमध्ये जुनी झोनल पद्धत पुन्हा सुरू केली आहे. दुसऱ्या सामन्यात कन्हैया वाधवानच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाचा सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाशी होईल. पश्चिम विभागात सरफराज खान नसला तरी गायकवाड, शार्दुल ठाकूर, तनूष कोटियन आणि शम्स मुलानी यांच्यामुळे संघ मजबूत आहे. उत्तर विभागाचे गोलंदाज गुरनूर ब्रार आणि औकिब नबी भारतीय संघासोबत श्रीलंकेत असल्याने या बाद फेरीच्या सामन्यात पराभव झाल्यास त्यांना पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही.