वैभवकडे सचिनसारखे कौशल्य; मात्र आंतरराष्ट्रीय पदार्पणाची घाई नको! माजी क्रिकेटपटू जतिन परांजपेंचे मत; लाल चेंडूचे सामने खेळण्याची सूचना 
क्रीडा

वैभवकडे सचिनसारखे कौशल्य; मात्र आंतरराष्ट्रीय पदार्पणाची घाई नको! माजी क्रिकेटपटू जतिन परांजपेंचे मत; लाल चेंडूचे सामने खेळण्याची सूचना

सचिन तेंडुलकरनंतर प्रथमच एखाद्या खेळाडूत मी अशाप्रकारची प्रतिभा पाहत आहे. वैभव सूर्यवंशी हा आपल्या देशाला लाभलेला मौल्यवान हिरा आहे. मात्र त्याला इतक्यात भारतीय संघात खेळवण्याची घाई करू नये, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य जतिन परांजपे यांनी नोंदवले. त्याशिवाय वैभवला लाल चेंडूच्या स्पर्धा खेळण्याचेही त्यांनी सुचवले.

ऋषिकेश बामणे

मुंबई : सचिन तेंडुलकरनंतर प्रथमच एखाद्या खेळाडूत मी अशाप्रकारची प्रतिभा पाहत आहे. वैभव सूर्यवंशी हा आपल्या देशाला लाभलेला मौल्यवान हिरा आहे. मात्र त्याला इतक्यात भारतीय संघात खेळवण्याची घाई करू नये, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य जतिन परांजपे यांनी नोंदवले. त्याशिवाय वैभवला लाल चेंडूच्या स्पर्धा खेळण्याचेही त्यांनी सुचवले.

१५ वर्षीय वैभवने गतवर्षी आयपीएलच्या पहिल्याच हंगामात धूमाकूळ घातला. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्येही वैभवच्या बॅटचा झंझावात कायम आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने जसप्रीत बुमरा, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांसारख्या सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्यामुळेच अनेक क्रिकेट तज्ज्ञ तसेच चाहते वैभवला भारतीय टी-२० संघात खेळवण्याची मागणी करत आहेत. सचिनने ज्याप्रमाणे वयाच्या १६व्या वर्षी पदार्पण केले आणि पुढे क्रिकेटची सर्व मैदाने गाजवली. त्याचप्रमाणे वैभवमध्येही क्षमता असल्याचे अनेकांचे मत आहे.

“वैभव हा खरंच एक खास खेळाडू आहे. कदाचित निवड समिती लवकरच त्याची भारतीय संघातही निवड करतील. तो पांढऱ्या चेंडूला सहज भिरकावून लावत आहे. मात्र त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये किमान १-२ हंगाम खेळू द्यावे. यामुळे तो अधिक स्थिरस्थावर होईल. सचिन हा महान खेळाडू झाला, कारण त्याने युवा वयातच आपल्या खेळातील त्रुटी सुधारल्या,” असे जतिन म्हणाले. ‘खेलो मोअर’ ॲपसंबंधी आयोजित चर्चा सत्रात जतिन यांनी नवशक्तिशी संवाद साधला. या ॲपमुळे खेळाडूंना आपल्या परिसरातील नामवंत क्रीडा अकादमी, प्रशिक्षक, मैदाने यांचा शोध घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे पालकांनाही मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेता येईल. यावेळीच सध्या चर्चेत असलेल्या वैभवविषयी जतिन यांनी मत मांडले.

“१९ वर्षांखालील एका स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध वैभव दोन वेळा बचावला आणि अखेरीस त्याच गोलंदाजाविरुद्ध बाऊन्सरवर बाद झाला. त्याच्या शब्दकोशात कदाचित ‘बचाव’ (डिफेंड) हा शब्दच नसावा. त्यामुळे सचिनसारखे कौशल्य असले, तरी त्याने स्वत:ला स्थिरावण्यासाठी वेळ द्यावा. वैभव लाल चेंडूच्या प्रकारात चेंडू डिफेंड करेल की नाही, याविषयी मला शंका वाटते,” असेही जतिन यांनी सांगितले. मात्र सध्या वैभव नक्कीच उत्तम लयीत असून त्याने असाच खेळ करत रहावा. असे खेळाडू फार क्वचित पाहायला मिळतात, असेही जतिन यांनी नमूद केले.

इम्पॅक्ट प्लेयर नियमास विरोध

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होत आहे. भारतामध्ये दर्जेदार अष्टपैलूंची उणीव आहे. मात्र या नियमामुळे आयपीएलमध्ये अष्टपैलूंना संधीच मिळत नाही किंवा त्यांच्या एकाच बाजूचा अधिक वापर होत आहे. त्यामुळे या हंगामात शक्य नसले, तरी किमान पुढील हंगामात या नियमाबाबत बीसीसीआयने विचार करावा, असे जतिन यांनी सांगितले.

कसोटीत वेगळ्या प्रशिक्षकाची गरज

क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या जतिन यांनी भारतीय संघासाठी कसोटी प्रकारात वेगळा प्रशिक्षक नेमावा, असेही सुचवले. गेल्या २ वर्षांत भारताला गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात मायदेशातच न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्याकडून व्हाइटवॉश पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यावर इंग्लंडला भारताने किमान बरोबरीत रोखले. "भारतीय संघ मर्यादित षटकांच्या प्रकारात शानदार कामगिरी करत आहे. मात्र कसोटीत भारताचा संघर्ष पाहता नक्कीच त्या प्रकारासाठी वेगळ्या प्रशिक्षकाचा विचार करू शकतो. तो प्रशिक्षक वर्षभर देशांतर्गत स्पर्धेतील सामने आवर्जून पाहणे गरजेचे आहे. कोणत्या रणजी संघातील कोणता खेळाडू चांगली कामगिरी करत आहे, हे त्यास ठाऊक असले पाहिजे," असे जतिन ठामपणे म्हणाले.

उकाड्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी; दुपारच्या सत्रात शाळा नको

पतीच्या हयातीत घटस्फोटीत पत्नीला वाढीव पोटगी मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

अमेरिकेचा मोठा निर्णय! 'इंडो-पॅसिफिक कमांड' नावातून 'इंडो' शब्द वगळला; पुन्हा केले 'यूएस पॅसिफिक कमांड'

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक; बोरघाटमार्गे मुंबई वाहिनीवरील सर्व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद

खुल्या कारागृहांच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारची समिती; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय