विराट जायबंदी; रोहितबाबत संभ्रम, स्नायूंच्या दुखापतीमुळे कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार (Photo-X)
क्रीडा

विराट जायबंदी; रोहितबाबत संभ्रम, स्नायूंच्या दुखापतीमुळे कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली स्नायूंच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली स्नायूंच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआय लवकरच याविषयी अधिकृत घोषणा करेल. मात्र बहुतांशी इंग्रजी संकेतस्थळांसह पीटीआयने विराटला किमान २-३ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. तसेच रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबतही संभ्रम असल्याचे समजते.

आयपीएलचा १९वा हंगाम नुकताच संपन्न झाला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ करणार आहे. ६ जूनपासून भारत-अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूर येथे कसोटी सामना रंगणार असून त्यानंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

३७ वर्षीय विराटच्या उजव्या पायाचे स्नायू आयपीएलच्या अंतिम सामन्यात ताणले गेले होते. त्यावेळी विराट धावताना काहीसा अडखळतानाही दिसला. तरीही विराटने नाबाद अर्धशतकी खेळी साकारून बंगळुरूला जेतेपद मिळवून दिले होते. मात्र आता तो अफगाणिस्तानविरुद्ध तिन्ही सामन्यांना मुकणार आहे. १३ जून रोजी धरमशाला येथे पहिला, तर १७ व २० जून रोजी अनुक्रमे लखनऊ व चेन्नई येथे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना होईल.

“स्नायूंच्या दुखापतीमुळे विराट एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. अंतिम सामन्यादरम्यान तो जायबंदी झाला होता. स्कॅनमध्ये त्याच्या पायाच्या स्नायूला गंभीर दुखापत (डिस्टल सेमीमेम्ब्रेनोसस टेंडन टिअर) झाल्याचे समोर आले आहे. ही एक दुर्मिळ दुखापत असून यामध्ये गुडघ्याच्या खालील हाडाच्या आतील भागाला स्नायू जोडणारा जाड अस्थिबंध प्रभावित होतो,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

विराटने बंगळुरूला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावताना एक शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने ६७५ धावा केल्या होत्या. कोहलीच्या अनुपस्थितीमुळे आगामी मालिकेची चमक नक्कीच कमी होणार आहे. भारताचा हा माजी कर्णधार आता केवळ एकाच स्वरूपाचे क्रिकेट खेळत असला तरी, जगभरातील चाहत्यांमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे.

विराटव्यतिरिक्त अनुभवी रोहितदेखील या मालिकेसाठी उपलब्ध असेल की नाही, याविषयी शंका आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे रोहित आयपीएलमध्ये काही सामन्यांना मुकला होता. त्यामुळे संघ जाहीर करताना तंदुरुस्तीच्या आधारावरच रोहितविषयीचा निर्णय घेतला जाईल, असे निवड समितीने स्पष्ट केले होते. “विराट किंवा रोहितसारख्या खेळाडूबाबत अशी बातमी असणे ही नक्कीच मोठी गोष्ट असते. रोहित शर्माच्या तंदुरुस्तीची तपासणी करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे म्हणाले. दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या तंदुरुस्तीची तपासणी करण्यासाठी काही दिवस असून वैद्यकीय पथकाच्या मंजुरीनंतर अधिकृत माहिती दिली जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

विराट आणि रोहित यांनी गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी दोघेही संघात असतील की नाही, याविषयी भाकीत वर्तवणे कठीण आहे.

ऋतुराजला संधी मिळण्याची शक्यता

विराटच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय संघात स्थान लाभू शकते. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत श्रेयसच्या अनुपस्थितीत एका लढतीत ऋतुराजने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतकही साकारले होते. तसेच रोहितही या मालिकेस मुकला, तर देवदत्त पडिक्कल किंवा यशस्वी जैस्वालपैकी एकाची निवड केली जाऊ शकते.

भारताचा ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौरा

भारतीय संघ २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांचा समावेश असेल. दोन्ही देश आपल्या क्रीडा संबंधांचे १००वे वर्ष या निमित्ताने साजरे करणार आहे. भारतीय संघ २०२०नंतर प्रथमच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ५ टी-२० सामने होतील. मग ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पाच एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे पहिली कसोटी, तर २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात ख्राइस्टचर्च येथे दुसरी कसोटी होईल.

खाद्यतेलाच्या पॅकिंग आकाराचे मानांकन होणार; पारदर्शकता वाढण्याचा उद्योग क्षेत्राचा अंदाज

FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक; तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई

कोकण रेल्वेची जुलैपासून रत्नागिरी ते जेएनपीटी थेट कंटेनर रेल्वे सेवा

ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

Nashik : बड्या विकासकांविरुद्ध गुन्हा दाखल; एनए प्लॉटच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक