मुंबई : दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी पुन्हा एकदा पात्रता फेरीचा सामना करावा लागणार आहे. सलग दुसऱ्या विश्वचषकात त्यांच्यावर अशी वेळ ओढवली आहे.
३० सप्टेंबर रोजी असणाऱ्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल आठ संघ २०२७ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे वगळता उर्वरित अव्वल आठ संघांना ही संधी मिळणार आहे. बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर अफगाणिस्तानने अव्वल आठ संघांमधील आपले स्थान निश्चित केले आहे.
सध्याच्या रचनेनुसार २०२३चा विजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान तसेच यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे संघ थेट पात्र ठरले आहेत. दुसरीकडे आयसीसी वनडे क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजला कट-ऑफ तारखेपूर्वी भारतासोबत दोन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. मात्र या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला तरी वेस्ट इंडिजला अव्वल आठ संघांत स्थान मिळवता येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पात्रता फेरीतूनच त्यांना मुख्य स्पर्धेत स्थान मिळवावे लागणार आहे.
विंडीजला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही थेट प्रवेश मिळवता आला नव्हता. त्यावेळी पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर राहिल्याने विंडीज संघ पहिल्यांदाच विश्वचषकातून बाहेर पडला होता. यामुळे वेस्ट इंडिजला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकावे लागले, ज्या स्पर्धेत ते २०१३ पासून खेळलेले नाहीत.